डॉ. आशिष देशपांडे : सुमारे तीन लाख महिला करतात मद्यपान
पणजी : अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात मद्यपानाचे प्रमाण अधिक आहे. गोव्याची लोकसंख्या १५ ते १६ लाख गृहित धरल्यास यातील जवळपास ३ लाख महिला मद्यपान करतात. यापैकी सुमारे ६० ते ८० हजार महिलांना अल्होकोल युज डिसऑर्डर (मद्याच्या आहारी जाणे) असण्याची शक्यता असल्याचे डॉ. आशिष देशपांडे यांनी सांगितले. अल्कोहोलिक्स ॲनॉनीमस संस्थेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिस्टर रोज या देखील उपस्थित होत्या.
डॉ. देशपांडे म्हणाले की, आमच्या निरक्षणानुसार सामान्यतः पुरुष आनंद मिळवण्यासाठी मद्यपान करतात. मात्र बहुतेक वेळेस महिला तणाव कमी करण्यासाठी मद्यपान करतात. महिला आणि पुरुषांत जैविक फरक आहे. यामुळे महिलांनी पुरुषांएवढे किंवा त्यापेक्षा कमी मद्यपान केले, तरी त्याचा शरीराला अधिक त्रास होतो. अल्होकोल युज डिसऑर्डर महिलांमध्ये अधिक वेगाने वाढत जाते. मध्य अथवा आणि अमली पदार्थांच्या सेवनाने महिलांच्या मेंदूतील रासायनिक स्त्रावांमध्ये बदल होतो.
डॉ. देशपांडे म्हणाले, कुटुंबातील एक व्यक्ती मद्याच्या आहारी गेली असली, तरी त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. मद्यपींबाबत असलेल्या सामाजिक कलंकाच्या संकल्पनांमुळे कुटुंबावर आणखी मोठा आघात होतो. अनेक प्रकरणात पुरुष मद्यपानामुळे होणाऱ्या समस्या किंवा मद्यपान सोडवण्यासाठी स्वतःहून पुढे येतात. अनेकदा यामध्ये त्यांचे कुटुंबीय त्यांना मदत करत असतात. मात्र अनेकदा महिलांच्या बाबत अशी मदत मिळत नाही. त्या स्वतःहून देखील पुढे येत नसल्याचे आम्हाला आढळून आले आहे. त्यामुळे महिला मद्यपींना शोधून त्यांना मदत करणे अवघड ठरते.
महिलांसाठी विशेष हेल्पलाईन
महिलांना मद्यपान सोडण्यास मदत करण्यासाठी अल्कोहोलिक्स ॲनॉनीमस संस्थेच्या कासावली कार्यालयातर्फे विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय केवळ महिलांसाठी बैठक सत्रांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. १८ मे रोजी संस्थेच्या ४८व्या वर्धापदिनानिमित्त या सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सिस्टर रोज यांनी सांगितले.