मानवाच्या दृष्टीबाहेरच्या अंतर्भौम सूक्ष्मजीवांचे अद्भुत रहस्य

या अंतर्भौम सूक्ष्मजीवांनी आपल्याला जीवनाविषयीच्या पारंपरिक कल्पनांना आव्हान दिलं आहे. ते आपल्याला शिकवतात की जीवनाचं स्वरूप हे अत्यंत विविध, आश्चर्यकारक आणि अनपेक्षित असू शकतं.

Story: लेखणी |
16th May 2025, 11:52 pm
मानवाच्या दृष्टीबाहेरच्या अंतर्भौम सूक्ष्मजीवांचे अद्भुत रहस्य

आपण जेव्हा "जीवन" या संकल्पनेचा विचार करतो, तेव्हा आपल्या मनात सूर्यप्रकाशात फुलणारी झाडं, पाण्यात पोहणारे मासे, जंगलात वावरणारे प्राणी आणि पक्ष्यांची सुरेल गाणी येतात. आपल्याला वाटतं की, जीवनासाठी सूर्यप्रकाश, पाणी आणि श्वास घेण्यासाठी प्राणवायू अत्यावश्यक आहे. मात्र, आधुनिक विज्ञानाने हे स्पष्ट केलं आहे की जीवन यापेक्षा खूप व्यापक आणि आश्चर्यजनक आहे.

पृथ्वीच्या खोल आत, जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, जिथे प्रचंड तापमान आणि अत्यंत उच्च दाब आहे तिथेही जीवन अस्तित्वात आहे! हे जीवन सूक्ष्म असतं, डोळ्यांना न दिसणारं म्हणूनच त्यांना "सूक्ष्मजीव" म्हणतात. हे जीव पृथ्वीच्या आत खोलवर राहतात, म्हणून त्यांना "अंतर्भौम सूक्ष्मजीव" असं नाव देण्यात आलं आहे.

हे जीव समुद्राच्या तळाशी, खोल खडकांमध्ये, ज्वालामुखींच्या परिसरात, अति खारट, आम्लीय किंवा क्षारीय वातावरणात आढळतात. त्यांना सूर्यप्रकाशाची किंवा प्राणवायूची गरज लागत नाही. हे जीव खडकांतील खनिजांपासून मिळणाऱ्या रासायनिक ऊर्जेवर जगतात. काही सूक्ष्मजीव सल्फर म्हणजे गंधक किंवा लोखंडाच्या ऑक्सिडेशन प्रक्रियेतून ऊर्जा मिळवतात. अशा जीवांना "केमोऑटोट्रॉफ्स" ( पाषाणरसायनजीवी) म्हणतात.

ही सूक्ष्मजीव सृष्टी इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही टिकून असते, की जिथे मोठे प्राणी किंवा वनस्पती असण्याची शक्यताही नसते, तिथे हे जीव सहज नांदत असतात. म्हणूनच त्यांना "अत्यंत प्रतिकूलतेतही जगणारे जीव"—extremophiles—म्हटलं जातं.

संशोधकांनी अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली, खोल समुद्रात, स्फोटक ज्वालामुखींच्या कडेला आणि खोल खाणींमध्ये या सूक्ष्मजीवांचा शोध घेतला आहे. विशेष बाब म्हणजे हे जीव हजारो वर्षांपासून अंधारात बंदिस्त असूनही जिवंत आहेत. त्यांचं जीवनचक्र अत्यंत संथ असतं—काही सूक्ष्मजीव एकदाच विभाजन होण्यासाठी शंभर वर्षांहून अधिक वेळ घेतात!

टेनेसी विद्यापीठाच्या डॉ. करेन लॉयड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असे सूक्ष्मजीव शोधले आहेत जे सल्फेटवर ऊर्जा मिळवून दर १०० वर्षांनी एकदाच विभाजित होतात. त्यांनी आधुनिक मेटाजेनॉमिक्स तंत्राचा वापर करून खोल जमिनीतील DNA गोळा केला आणि त्याचं संगणकीय विश्लेषण करून अनेक अनोळखी जीव शोधून काढले.

हे सूक्ष्मजीव केवळ वैज्ञानिक कुतूहलासाठी नव्हे, तर पर्यावरणीय आणि जैवतांत्रिक दृष्टिकोनातूनही फार मोलाचे ठरतात. काही सूक्ष्मजीव हवेमधील मिथेन वायू किंवा कार्बन डायऑक्साइड विघटित करून हवामान बदलांवर परिणाम करतात. काही जीव सोनं, तांबं, झिंक यांसारख्या धातूंना खडकांतून वेगळं करतात—या प्रक्रियेला बायोमायनिंग म्हणतात—जी पर्यावरणपूरक खाण तंत्रज्ञानासाठी महत्त्वाची आहे.

याशिवाय, काही सूक्ष्मजीव दूषित जलस्रोतांमधून विषारी घटक शोषून पाण्याचं शुद्धीकरण करू शकतात. वैद्यकीय क्षेत्रातही हे जीव उपयुक्त ठरतात, कारण त्यांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट संयुगांचा वापर करून नवीन औषधं विकसित करता येतात.

या सूक्ष्मजीवांचा अभ्यास अंतराळ विज्ञानातही केला जातो. कारण जेव्हा पृथ्वीवरील इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जीवन संभवतं, तेव्हा मंगळ ग्रहावर, ज्युपिटरचा चंद्र युरोपा आणि शनीचा चंद्र टायटन यांसारख्या ठिकाणीही जीवन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या अंतर्भौम सूक्ष्मजीवांनी आपल्याला जीवनाविषयीच्या पारंपरिक कल्पनांना आव्हान दिलं आहे. ते आपल्याला शिकवतात की जीवनाचं स्वरूप हे अत्यंत विविध, आश्चर्यकारक आणि अनपेक्षित असू शकतं. जिथे आपण "इथे जीवन असू शकत नाही" असं गृहीत धरतो, तिथेही निसर्ग काहीतरी अद्भुत घडवतो.

हे सूक्ष्मजीव दिसायला अतिशय लहान असले तरी, त्यांचं महत्त्व अत्यंत व्यापक आहे—पृथ्वीच्या इतिहासात, हवामान बदलांमध्ये, पर्यावरणसंवर्धनात आणि भविष्यातील वैज्ञानिक संशोधनात. ते आपल्याला नव्यानं विचार करायला लावतात—जीवन म्हणजे नेमकं काय? त्यासाठी काय आवश्यक आहे? आणि आपण अजून किती गोष्टींचा शोध घेणं बाकी आहे? हे संशोधन आम्ही फार पुरातन खडक व खनिजे असलेल्या गोव्यातही करीत आहोत पण त्याबद्दल नंतर कधीतरी तपशीलवार लिहिन.


डॉ. प्रा. सुजाता 

दाबोळकर