कॅनडाच्या नवीन सरकारमध्ये भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांना परराष्ट्रमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या मंत्रिमंडळात अनिता आनंद यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यापूर्वी, संरक्षण मंत्रिपदाची शपथ घेतानाही त्यांनी याच पद्धतीने शपथ घेतली होती. अनिता आनंद या लिबरल पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यांनी यापूर्वी कॅनडाच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता त्यांना मेलानी जोली यांच्या जागी परराष्ट्र मंत्री बनवण्यात आले आहे, तर मेलानी जॉली यांना उद्योग मंत्री पद देण्यात आले आहे. ५८ वर्षीय अनिता आनंद या कॅनडाच्या सरकारमध्ये सेवा देणाऱ्या पहिल्या हिंदू नेत्या आहेत. यापूर्वीही, जेव्हा अनिता आनंद कॅनडाच्या सरकारचा भाग बनल्या होत्या, तेव्हा त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती.
जस्टिन ट्रुडो युगाचे अनुसरण करण्याऐवजी पंतप्रधान मार्क कार्नी यांनी नवीन सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळात अनुभव आणि विविधतेची पूर्ण काळजी घेण्यात आली असून, निम्म्या मंत्री महिला आहेत.
अनिता आनंद यांनी परराष्ट्र मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘एक सुरक्षित, न्याय्य जग निर्माण करण्यासाठी आणि कॅनेडियन लोकांची सेवा करण्यासाठी मी पंतप्रधान मार्क कार्नी आणि माझ्या टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे,’ असे म्हटले आहे.
अनिता आनंद यांचा जन्म २० मे १९६७ रोजी कॅनडातील नोव्हा स्कॉशिया येथील केंटविले येथे झाला. त्यांचे पालक, सरोज डी राम आणि एसव्ही आनंद, १९६०च्या दशकात भारतातून कॅनडाला स्थलांतरित झाले. ते दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. अनिताची आई पंजाबची आणि वडील तामिळनाडूचे आहेत. अनिताने ऑक्सफर्ड विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यांनी डलहौसी विद्यापीठ आणि टोरंटो विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. अनिता आनंद यांनी कायदा, शिक्षण आणि सार्वजनिक सेवा यासारख्या क्षेत्रात काम केले आहे. १९९५ मध्ये त्यांनी कॅनेडियन वकील जॉन नॉल्टन यांच्याशी लग्न केले. दोघांना चार मुले आहेत.
अनिता आनंद यांनी कॅनडाच्या संरक्षण मंत्री असताना अनेक महत्त्वाची कामे केली, ज्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. अनिता आनंद यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतलेली शपथ हे कॅनडाच्या राजकारणातील एक महत्त्वाचे आणि लक्षणीय उदाहरण ठरले आहे.
- सुदेश दळवी