कंपनीच्या इतर शेअर होल्डर्समध्येही गोंधळाचं वातावरण
नवी दिल्लीः भारताच्या विरोधात जाऊन पाकिस्तानच्या दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या तुर्कीवर आता वेगवेगळ्या मार्गाने निर्बंध आणण्यात येत आहेत. देशभरातून ‘बॉयकॉट तुर्की’चा सूर उमटत आहे.
अनेकजण तुर्कीच्या वस्तू बॉयकॉट करत असून सर्वांत आधी पुण्यातील व्यापाऱ्यांनी तिथले सफरचंद विकण्यावर बहिष्कार टाकला. याशिवाय भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव तुर्कस्तानची सरकारी टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डचे भारतातील सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले.
त्यानंतर आता अनेक भारतीय विमानतळावर हँडलिंग सेवा देणाऱ्या 'सेलेबी एव्हिएशन होल्डिंग्ज' या तुर्कीच्या कंपनीचा भारताने सिक्युरिटी परवाना रद्द केला असून त्याचा परिणाम तुर्कीमध्ये दिसून आला.
इस्तंबुल शेअर मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या कंपनीच्या इतर शेअर होल्डर्समध्येही गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
भारतातील मुंबई, दिल्ली, चेन्नईसह नऊ महत्त्वाच्या विमानतळांवर ग्राऊंड हँडलिंग सुविधा पुरवणाऱ्या या तुर्की कंपनीचे सिक्युरिटी क्लिअरन्स मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय हित लक्षात घेता घेण्यात आला. त्यानंतर या कंपनीच्या तुर्कीमधील शेअर्समध्ये १० टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले.
'यामुळे' वादाला तोंड फुटले
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिक ठार झाल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी लष्कराकडून 'ऑपरेशन सिंदूर' करण्यात आले होते.
दरम्यान तुर्कस्तानने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने भारत आणि तुर्कस्तानमधील तणाव वाढला आहे. तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ७ मे रोजी एक निवेदन जारी करून 'ऑपरेशन सिंदूर'ला 'चिथावणीखोर पाऊल' म्हटल्याने त्यानंतर या वादाला तोंड फुटले होते.