उपचारांसाठी विलंब केल्याने गतवर्षी तिघांचा डेंग्यूमुळे मृत्यू!

डॉ. कल्पना महात्मे : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात राष्ट्रीय डेंग्यू दिन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
उपचारांसाठी विलंब केल्याने गतवर्षी तिघांचा डेंग्यूमुळे मृत्यू!

मडगाव : राज्यात गतवर्षी डेंग्यूची रुग्णसंख्या दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात जास्त होती. यात बांधकाम ठिकाणी परप्रांतीय व्यक्तींचा समावेश जास्त होता. गेल्या वर्षी एकूण ५६७ डेंग्यूची प्रकरणे होती. गेल्या वर्षी लक्षणे दिसूनही उपचारांसाठी विलंब केल्याने तिघांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात शुक्रवारी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसंचालक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना महात्मे, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर, वैद्यकीय अधिकारी बाप्तिस मास्कारेन्हास यांच्यासह इतर उपस्थित होते. यावेळी महात्मे यांनी सांगितले की, डेंग्यूचे डास हे दिवसा चावा घेतात. डेंग्यूची लक्षणे दिसताच नजीकच्या आरोग्य केंद्रात जाण्याची गरज आहे. डासांमुळे डेंग्यूसह चिकुनगुनिया, झिका इत्यादी आजारांचीही लागण होऊ शकते. गेल्यावर्षी मध्ये ५६७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून त्यातील २३५ रुग्ण हे मान्सूनपूर्व व पावसानंतरच्या वातावरणातआढळले, तर इतर साथरोगाच्या कालावधीत सापडले. ज्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यातील दोघांना उशिराने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तर तिसरा रुग्ण हा डेंग्यूसह इतर आजारांनी ग्रस्त होता. लक्षणे दिसताच तत्काळ उपचारासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रात जावे. यावर्षी सर्व आरोग्य केंद्रांना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना घेण्याची सूचना केलेली आहे. लोकांनीही साथ देण्याची गरज आहे, असेही डॉ. महात्मे यांनी सांगितले.
डॉ. बोरकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय डेंग्यू दिन हा लोकांमध्ये जनजागृतीसाठी साजरा केला जातो. साथरोग टाळण्यासाठी लोकांच्या सहकार्याची आवश्यकता असते. काही भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी साठवले जाते. त्यामुळे केवळ आरोग्य विभागात नाही, तर बांधकाम विभाग व इतर विभागांच्याही सहकार्याची आवश्यकता या मोहिमेसाठी असेल.

स्वच्छता गरजेची : डॉ. महात्मे

साथरोग टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे परिसर स्वच्छतेची काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारची पाणी साठवणूक केले जाऊ नये. पाणी साठवण्याच्या चुकीच्या पद्धती, जास्त पाऊस व बांधकामांच्या ठिकाणी असलेली परिस्थिती याचा परिणाम म्हणून साथरोग पसरल्याचे दिसून आले आहे, असे डॉ. महात्मे यांनी सांगितले. 

हेही वाचा