झाडांची पडझड होऊन काहीकाळ वाहतूक खोळंबली.
डिचोलीः डिचोली भागात अनेक ठिकाणी सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडला. उन्हाचे चटके सहन करणाऱ्या लोकांना हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. अनेक ठिकाणी सखलभागात पाणी साचल्याने वाहनचालकांची काही काळ गैरसोय झाली.
चमकणाऱ्या विजा व गडगडाटांसह पाऊस आल्याने काही वेळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. शुक्रवारी सकाळी आणि दुपारी डिचोली शहर आणि लगतच्या भागात पावसाचा जोर दिसून आला.
मान्सून अगोदरच्या या पावसाने काही ठिकाणी झाडांची पडझड होऊन काहीकाळ वाहतूक खोळंबली. मात्र डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जात झाडे बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.
काही ठिकाणी रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण काम सुरू असून पावसामुळे त्याच्यावर परिणाम झाला आहे. सद्य स्थितीत पालिका व पंचायत मंडळाकडून मान्सूनपूर्व कामे सुरू असून काही ठिकाणी गटारे साफसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण दिसून येत असून राज्यासह लगतच्या सिंधुदुर्गात बुधवार, गुरुवारी वरुणराजाने हजेरी लावली. ग्रामीण भागात सध्या आंबा, काजूचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून या अवकाळीचा परिणाम या पिकांवरही पहायला मिळाला.