ज्या योजनेद्वारा निधी मिळत होता, ती योजना महिला आणि बालकल्याण खात्याकडून समाज कल्याण खात्याकडे करण्यात आलीय प्रवर्ग
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्ट्रीट प्रोव्हिडन्स एनजीओला सात दिवसांच्या आत दोन महिन्यांचा निधी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डोनाल्ड फर्नांडिस यांनी दिली. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि बेघर लोकांबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या विषयाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात स्ट्रीट प्रोव्हिडन्सला निधी मंजूर केला आहे. मात्र काही प्रशासकीय कारणास्तव आम्हाला ज्या योजनेखाली निधी मिळत होता, ती योजना महिला आणि बालकल्याण खात्याकडून समाज कल्याण खात्याकडे प्रवर्ग केली आहे.
हा बदल १ एप्रिल पासून करण्यात आला आहे. समाज कल्याण खात्याकडून योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम याबाबत अधिसूचना जारी करावी लागणार आहे. यासाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे फर्नांडिस म्हणाले.
'आमच्या संस्थेकडे सध्या पुरेसा निधी उपलब्ध नाही. संस्थेच्या निवारागृहात सुमारे १९० जण राहत आहेत. यांचा महिन्याचा खर्च खूप जास्त आहे. सध्या आमच्याकडे मे महिन्यापर्यंत पुरतील एवढेच पैसे आहेत. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी पुढील दोन महिन्याचे पैसे आगावू स्वरूपात देण्याचे आश्वासन दिले आहे.
याशिवाय आम्ही त्यांना आयपीएसमध्ये मुलांसाठी विशेष वार्ड नसणे, रस्त्यावरील दिव्यांग व्यक्तींना पोलिसांकडून सहकार्य न मिळणे, मानसिक आजारांवरील उपचारासाठी इस्पितळांची कमतरता', अशा समस्यांबाबत माहिती दिल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.