१० दिवसानंतर पुन्हा सुरू होणार आयपीएल
बंगळुरू : आयपीएल २०२५ चा ५८ वा सामना कोलकता नाइट राइडर्स विरुद्ध राॅयल चॅलेंडर्स बंगळुरू यांच्यामध्ये लढत होणार आहे. १० दिवसानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेल्या तणावाच्या वातावरणामुळे आता पुन्हा आयपीएल सुरू होणार आहे. यासाठी सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या सामन्याचे आयोजन एम चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्यात आले आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता खेळवला जाणार आहे. तर या सामन्याचे नाणेफेक हे ७ वाजता होणार आहे.
आता या सामन्यावर पावसाची सावली पडू लागली आहे. गुरुवारी बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे स्टेडियममध्येही पाणी साचले होते. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे, यामध्ये टीम डेव्हीड हा मैदानावर साचलेल्या पाण्यामध्ये भिजताना दिसला.
हवामान खात्याच्या अहवालानुसार, १७ मे रोजी बेंगळुरूमध्ये पावसाची ८४ टक्के शक्यता आहे. रात्रीच्या वेळी पावसाची ९४ टक्के शक्यता असेल. याशिवाय ढग सतत राहतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. बेंगळुरूमध्ये दुपारपासून पाऊस सुरू होऊ शकतो. संध्याकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची ४० टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना रद्दही होऊ शकतो. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना १-१ गुण दिले जातील. आरसीबी संघ १ गुण मिळवताच प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
सध्या आरसीबीच्या १८ व्या हंगामात ११ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी रजत पाटीदारच्या संघाने ८ जिंकले आणि ३ गमावले. सध्या आरसीबीचे १६ गुण आहेत. अशा परिस्थितीत, जर संघाचा केकेआर विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरेल. सहसा एखादा संघ १६ गुणांवर प्लेऑफमध्ये पोहोचतो पण यावेळी तसे झाले नाही. आरसीबी आणि गुजरात टायटन्स संघ १६-१६ गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. सामना रद्द झाल्यास आरसीबीला १ गुण मिळेल. या १ गुणासह, आरसीबीचे १७ गुण होतील आणि संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
बंगळुरू संघाचे अजून तीन सामने शिल्लक आहेत आणि यापैकी दोन सामने जिंकल्यास ते गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर पोहोचू शकतात, जिथे ते जास्तीत जास्त २२ गुण मिळवू शकतात. जरी त्यांनी दोन सामने जिंकले तरी ते पहिल्या दोनमध्ये राहतील, तर एक विजय त्यांना पहिल्या चारमध्ये स्थान मिळवून देईल. जर त्यांनी त्यांचे सर्व तीन सामने गमावले, तरीही चांगल्या नेट रन रेटच्या आधारावर ते क्वालिफाय करू शकतात. दुसरीकडे, कोलकाता आता जास्तीत जास्त १५ गुण मिळवू शकते. त्यानंतर त्यांना क्वालिफाय करण्यासाठी इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
चिन्नास्वामी स्टेडियमवर केकेआरचे वर्चस्व
केकेआरसाठी चांगली गोष्ट म्हणजे या मैदानावर त्यांचे असलेले वर्चस्व. त्यांनी या मैदानावर बंगळुरूविरुद्ध खेळलेल्या १२ सामन्यांपैकी आठ सामने जिंकले आहेत. कोलकाताने या मैदानावर आरसीबीविरुद्ध सलग सहा विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे यापैकी पाच सामन्यांमध्ये विराट कोहलीने अर्धशतक झळकावले आहे.
उत्कृष्ट फिरकी गोलंदाजांच्या दोन तगड्या संघांचा सामना
कोलकाताच्या सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी गोलंदाजांच्या जोडीने आपल्या संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. नारायणने तर बंगळुरूविरुद्ध सर्वाधिक २७ विकेट्स घेतले आहेत. मात्र, आरसीबीकडेही कृणाल पांड्या आणि सुयश शर्मासारखे चांगले फिरकी गोलंदाज आहेत. जेव्हा हे दोन्ही संघ यापूर्वी आमनेसामने आले होते, तेव्हा कृणालने आपल्या प्रभावी गोलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे या सामन्यात फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
यांच्यावर असणार नजर
विराट कोहली विरुद्ध नारायण, रसेल
विराट कोहली आणि कोलकाताचे नारायण व आंद्रे रसेल यांच्यातील लढाई पाहण्यासारखी असेल. कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने मधल्या षटकांमध्ये ही लढाई अधिक रोमांचक होईल. आयपीएलमध्ये नारायणविरुद्ध खेळताना कोहलीने १७ डावांमध्ये ३४ च्या सरासरीने केवळ १३६ धावा केल्या आहेत आणि तो चार वेळा बाद झाला आहे. तर, रसेलविरुद्ध त्याने १४ डावांमध्ये ४०.३ च्या सरासरीने १२१ धावा केल्या आहेत आणि तीन वेळा त्याची विकेट गेली आहे. त्यामुळे या दोघांविरुद्ध कोहलीची रणनीती काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अजिंक्य रहाणे विरुद्ध भुवनेश्वर, कृणाल
अजिंक्य रहाणेने या हंगामात कोलकातासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याला पॉवरप्लेमध्ये भुवनेश्वर कुमारचा आणि मधल्या षटकांमध्ये कृणाल पांड्याचा सामना करावा लागेल. या दोघांविरुद्ध रहाणेचा विक्रम फारसा चांगला नाही. भुवनेश्वरविरुद्ध खेळताना त्याने १८ डावांमध्ये १४.९ च्या खराब सरासरीने केवळ १०४ धावा केल्या आहेत आणि सात वेळा तो बाद झाला आहे. त्याचबरोबर कृणालविरुद्ध त्याने १० डावांमध्ये १५.३ च्या खराब सरासरीने ६१ धावा केल्या आहेत आणि चार वेळा त्याची विकेट गेली आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यात रहाणे या दोघांच्या गोलंदाजीचा कसा सामना करतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.