पूर्णानंद च्यारी : कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
पणजी : कोकणी अकादमीचे शैक्षणिक कार्य वाढवण्याबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत अकादमीचे कार्य पोहचवण्यावर माझा भर असेल, असे कोकणी अकादमीचे नवीन अध्यक्ष पूर्णानंद च्यारी म्हणाले. गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष म्हणून पूर्णानंद च्यारी यांची तीन वर्षांसाठी नेमणूक झाली आहे.
अध्यक्ष म्हणून पूर्णानंद च्यारी यांच्यासह तीन सदस्यांची नेमणूक झाली आहे. रमेश घाडी, संतोष केरकर आणि माया खरंगटे यांची सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे. प्रा. अरुण साखरदांडे यांनी कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर वसंत सावंत यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती. आता पूर्णानंद च्यारी यांची पूर्ण वेळ अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे.
कोकणी अकादमीचे कार्य जोरात सुरू आहे. यापुढे शैक्षणिक कार्य वाढवण्याकडे मझा लक्ष असेल. अकादमीचे कार्य, योजना विद्यार्थी तसेच शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहचायला हवे. साहित्य, संशोधन तसेच सर्व क्षेत्रात दर्जात्मक कार्य वाढवायला हवे, असे पूर्णानंद च्यारी यांनी सांगितले.
कोकणी ही गोव्याची राजभाषा आहे. राजभाषेचा वापर प्रशासन तसेच इतर कामकाजात करण्यासाठी सरकारने कार्य सुरू केले आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अध्यक्ष या नात्याने आपण राजभाषेच्या कार्यवाहीविषयी सरकारला विविध सूचना करणार आहे. राजभाषेची सरकारी कामकाजात जोरात कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- पूर्णानंद च्यारी, कोकणी अकादमीचे अध्यक्ष