११० जीर्ण सरकारी वाहनांच्या लिलावातून मिळाले १.२४ कोटी

राज्य सरकारला ६५ लाख रुपयांचा निव्वळ फायदा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th May, 12:24 am
११० जीर्ण सरकारी वाहनांच्या  लिलावातून मिळाले १.२४ कोटी


पर्वरीतील कदंब डेपोत लिलावासाठी ठेवलेली वाहने. (छाया : समीप नार्वेकर)

पणजी : गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने कदंबच्या जीर्ण बसेससह इतर खात्यांच्या ११० जुन्या गाड्यांचा लिलाव करून १.२४ कोटी महसूल सरकारी तिजोरीत जमा केला. पर्वरी येथे जुन्या वाहनांच्या लिलावाला मोठा प्रतिसाद मिळाला.

गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने कदंब वाहतूक महामंडळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, नियोजन आणि सांख्यिकी खाते, वीज खाते, शिक्षण खाते, गोवा शिक्षण विकास महामंडळ, गोवा विधानसभा, सामान्य प्रशासन खाते आणि पोलीस महानिरिक्षकांचे कार्यालय यांच्या ११० जीर्ण वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी पर्वरी येथील कदंब महामंडळाच्या डेपोत लिलाव केला.


महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ११० वाहनांचे ४२ लॉट्समध्ये वाटप केले होते. लिलावावेळी ५० बोलिदारांनी बोली लावली. सर्वांत जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तींना ती वाहने स्वाधीन करण्यात आली. या सर्व ११० वाहनांची‌ किमान किंमत ५८.९४ लाख होती, तर १.२४ कोटी किंमत या वाहनांना मिळाली. यामुळे सरकारला ६५ लाख फायदा या जीर्ण वाहनांच्या लिलावातून झाला.

यात १५ वर्षांवरील आणि १५ वर्षांखालील वाहनांचा समावेश होता. जी १५ वर्षांपूर्वीची वाहने आहेत ती फक्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा (आरव्हीएसएफ) असलेल्या कंत्राटदारांनी बोली लावून विकत घेतली, तर १५ वर्षांखालील वाहने सामान्य लोकांनी लिलावात बोली लावून विकत घेतली.

या सर्व ११० जीर्ण वाहनांचा कमीत कमी मिळून एकूण ५८.९५ लाख दर होता. लिलावात बोलिदारांनी या दरापेक्षा जास्तीत जास्त बोली लावून ही वाहने घेतली. ११० मधील ७७ वाहने १५ वर्षांवरील, तर ३३ वाहने १५ वर्षांखालील होती.

परवडणारे दर...

१५ वर्षांखालील वाहने, जी सामान्य लोकांना विकत घ्यायला मिळतात, त्यांच्या लिलावाचे बोलीचे कमीत कमी दर परवडण्यासारखे होते. यात टोयोटा इनोव्हा गाडीचा किमान दर ३० ते ५० हजारांपर्यंत होता. टाटा सुमो आणि महिंद्रा स्कॉर्पियोचे किमान दर सुमारे ५४ हजारपर्यंत होते, तर ६ बुलेट दुचाकींचा किमान दर ४,८०० पर्यंत होता. बजाज पल्सरची किमान रक्कम ४,०००, तर स्प्लेंडरची ३,६०० रुपये होती.

हेही वाचा