दुचाकींसाठी अधोरेखित केलेल्या पार्किंग जागेत उभ्या केल्या जातात चारचाकी
पणजीतील महालक्ष्मी मंदिराजवळ अशा प्रकारे दुचाकींच्या जागी चारचाकी उभ्या केल्या जातात. (समीप नार्वेकर)
पणजी : पणजीत पार्किंगचा सावळा गोंधळ सुरू आहे. जी जागा दुचाकी पार्क करण्यासाठी अधोरेखित केलेली आहे, त्या जागी चारचाकी आणि टेम्पो पार्क केले जात आहेत. हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन असूनही त्यावर कसलीच कारवाई केली जात नाही. या उल्लंघनामुळे दुचाकी चालकांना असुविधा निर्माण होते, तसेच ही चारचाकी वाहने रस्त्यावर बाहेर येते असल्यामुळे अपघातांचीही शक्यता वाढली आहे.
महालक्ष्मी मंदिरासमोरील जुन्ता हाऊसकडे जाणाऱ्या डॉ. पी. शिरगावकर रस्त्याची एक बाजू दुचाकी पार्क करण्यासाठी अधोरेखित केली आहे, पण या जागेवर दुचाकी सोडून इतर गाड्या पार्क केल्या जातात. ही जागा दुचाकी पार्क करण्यासाठी राखीव ठेवल्याची सूचना देणारा फलक तेथे लावलेला आहे. पण या फलकाकडे दुर्लक्ष करून लोक सरळ दुचाकीच्या जागेवर चारचाकी पार्क करत आहेत. हे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आहे, तरीही या वाहनांना लॉक करून त्यांना कसलाही दंड आकारला जात नाही.
या विषयी बोलताना आम आदमी पक्षाच्या नेत्या सेसिल रॉड्रिग्ज यांनी प्रश्न केला आहे की, येथे टेम्पो उभे केले जातात आणि ते रस्त्याबाहेर येतात, त्यामुळे महालक्ष्मी मंदिराकडून एखादी दुचाकी येते, तेव्हा ती तेथे अडकून पडते. यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पणजी महानगरपालिकेने यात लक्ष घालून ही समस्या सोडवायला हवी. जे कोणी या चुका करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
अपघात घडण्याची शक्यता
दुचाकी पार्क करण्यासाठी तेथे पांढरी रेषा आखलेली आहे. दुचाकीच्या आकारावरून ती पांढरी रेषा रंगवलेली आहे. तेथे चारचाकी वाहने पार्क केल्यानंतर ती वाहने पांढऱ्या रेषेच्या बाहेर येतात. या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने ये-जा करतात, त्यामुळे या चारचाकी रस्त्याबाहेर येत असल्याने तेथे अपघात घडण्याची शक्यता आहे. येथे टेम्पो पार्क केले जात असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. महालक्ष्मी मंदिराकडून या रस्त्यावर येताना समोरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे.