आयएएस यतींद्र मराळकर, संजीव गडकर गोव्यात
🏛️ पणजी : शिरगाव येथील लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीस जबाबदार ठरवण्यात आलेल्या आयएएस अधिकारी स्नेहा गीते यांच्यासह उत्तर गोवा जिल्हाधिकारी म्हणून नुकतीच नेमणूक झालेल्या यशस्वीनी बी. आणि अश्विन चंद्रू या आयएएस अधिकाऱ्यांची अरुणाचल प्रदेशमध्ये बदली करण्यात आली आहे. तर, नागरी सेवेतील बढत्यांनंतर आयएएसपदी नेमणूक झालेल्या यतींद्र मराळकर आणि संजीव गडकर या दोन अधिकाऱ्यांची गोव्यात बदली झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचे अवर सचिव राकेशकुमार सिंग यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
🔄 स्नेहा गीते, यशस्वीनी बी. आणि अश्विन चंद्रू यांच्या बदल्यांनंतर यतींद्र मराळकर आणि संजीव गडकर यांच्यासोबत जम्मू-काश्मिरात कार्यरत आयएएस अधिकारी शकील उल रेहमान राथर, लडाखमध्ये कार्यरत संतोष सुखदेव आणि लक्षद्वीपमध्ये कार्यरत असलेल्या अर्जुन मोहन या आयएएस अधिकाऱ्यांची गोव्यात बदली करण्यात आली आहे. याशिवाय गोव्यात कार्यरत असलेल्या रमेश वर्मा, अरुण कुमार मिश्रा आणि सुनील आंचिपाका या तीन आयएएस अधिकाऱ्यांची दिल्लीला बदली करण्यात आली आहे.
✅ नवीन नियुक्त अधिकाऱ्यांकडून जनतेला अधिक सक्षम व पारदर्शक सेवा मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी गोव्यात गोमंतकीयच आयएएस अधिकारी हवेत, अशी इच्छा विरोधी पक्षांकडून वारंवार व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, यतींद्र मराळकर आणि संजीव गडकर या दोन गोमंतकीय अधिकाऱ्यांची गोव्यात बदली झाल्याने अनेकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
नागरी सेवेतील बढत्यांनंतर आयएएस झालेल्या यतींद्र मराळकर यांची लडाखमध्ये, तर संजीव गडकर यांची जम्मू-काश्मीरमध्ये बदली झालेली होती. हे दोन्ही अधिकारी आता पुन्हा गोव्यात येत असल्याने त्यांच्या अनुभवाचा राज्याला निश्चित फायदा होईल, असा विश्वास अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गोव्यात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावर कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी ओमवीर सिंग बिश्नोई यांचीही केंद्र सरकारने गोव्यातून दिल्लीला बदली केली असून, केशव राम चौरासिया यांची दिल्लीहून गोव्यात बदली करण्यात आली आहे.
स्नेहा गीते : | अरुणाचल प्रदेश |
यशस्वीनी बी. : | अरुणाचल प्रदेश |
यतींद्र मराळकर : | गोवा |
अश्विन चंद्रू : | अरुणाचल प्रदेश |
संजीव गडकर : | गोवा |
शकील राथर : | गोवा |