शिफारशींनुसार बदल; ऑक्टोबरनंतर होणार कारवाई
🏛️ पणजी : कला अकादमीच्या नाट्यगृहासंदर्भात कृतिदल आणि सल्लागारांनी सादर केलेले अहवाल आपल्याला मिळाले आहेत. त्यांच्या शिफारशींनुसार आवश्यक ते बदल केले जातील. सल्लागारांनी आता ज्या शिफारशी केलेल्या आहेत, त्या अगोदरच्या कंत्राटामधील असतील, तर ती कामे मोफत करून घेऊन संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
🎤 कृतिदलाच्या शिफारशीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) नियुक्त केलेल्या रॉजर ड्रेगो (ध्वनी), शीतल तळपदे (प्रकाश यंत्रणा) आणि राजन भिसे (रंगमंच) या तीन सल्लागारांनी काहीच दिवसांपूर्वी नाट्यगृहातील अनेक त्रुटींचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केला.
🎬 कला अकादमीत नाटकांसह 'इफ्फी' काळात चित्रपटही सादर केले जातात. त्याचा विचार करून संबंधित सल्लागाराने नाटक आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून नाट्यगृहाची रचना केली. परंतु, हे नाट्यगृह चित्रपट प्रसारित करण्याच्या दृष्टीने दर्जेदार आहे. नाटकांसाठी मात्र साऊंड आणि प्रकाश योजना योग्य नाही. त्यामुळे त्यात बदल करण्यात यावे.
❄️ याशिवाय नाट्यगृहात असलेल्या एसीचा आवाज नाटक सुरू असताना माईकमध्ये जात असल्याने त्याचा फटका अभिनय करणाऱ्या कलाकारांना बसतो. त्यामुळे नाट्यगृहातून एसी हटवून तेथे वेगळ्या प्रकारची व्यवस्था करावी, अशा शिफारशी तिन्हीही सल्लागारांनी अहवालातून केल्या होत्या.
⚖️ जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई हवी : सरदेसाई
कामात भ्रष्टाचार झाल्याचा आपला दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मान्य केला आहे. ही कामे निविदा जारी न करताच केल्याचे अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी विधानसभेत जाहीर केले. त्यामुळे निविदा न जारी करताच जुन्या कंत्राटदाराला काम ज्या अधिकाऱ्यांनी दिले, त्यांच्यावर काय कारवाई होणार, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.