दिल्लीत ‘स्वदेशी जागरण’ आक्रमक पवित्रात
नवी दिल्ली : तुर्की या देशाने भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे आणि ड्रोन, शस्त्रांची पुरवणी केल्यामुळे तुर्कीविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने तुर्किची ग्राउंड हॅँडलिंग कंपनी सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेसचा सुरक्षा परवाना रद्द केला होता. तर अदानी उद्योगसमूहाने देखील तुर्कियेसोबतचे कंत्राट रद्द केले होते.
याच दरम्यान शुक्रवारी तुर्की देशाच्या दूतावासासमोर स्वदेशी जागरण मंचाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. स्वदेशी जागरण मंचच्या कार्यकर्ते दूतावासाकडे जात होते. मात्र तत्पूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले.
आता ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) ने तुर्की आणि अझरबैजानवर पूर्ण बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. एआयसीडब्ल्यूए म्हणते की 'या दोन्ही देशांचा दृष्टिकोन भारताविरुद्ध आहे. त्यामुळे आता आम्ही चित्रपटाशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसून प्रत्येक पावलावर सरकारसोबत उभे राहणार', असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑल इंडियन सिनेवर्कर्स असोसिएशनने स्पष्टपणे म्हटले आहे की 'जर कोणताही कलाकार किंवा निर्मात्याने या बहिष्काराचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याला इंडस्ट्रीमध्ये निषेध आणि विरोधाला सामोरे जावे लागेल'.
भारतात सोशल मीडियावर या दोन्ही देशांसाठी बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला. या ट्रेंडचा परिणाम इतका झाला की एका आठवड्यातच या देशांसाठी ६० टक्के प्रवास बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. एकंदरीत वातावरण पाहता देशभरात तुर्कीविरोधाची लाट पसरत चालली आहे.