नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला पुरस्कार प्रदान सोहळा
नवी दिल्लीः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला. तसेच पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेल्या गुलजार यांचेही ज्ञानपीठ पुरस्कारासाठी त्यांनी अभिनंदन केले.
गुलजार यांची प्रकृती लवकरच पूर्णपणे बरी होऊन ते सक्रिय व्हावेत आणि त्यांनी कला, साहित्य, समाज आणि देशासाठी योगदान देत राहावे, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे उत्कृष्टतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असूनही त्यांनी त्यांच्या दिव्य दृष्टिकोनाने साहित्य आणि समाजाची असाधारण सेवा केली आहे.
रामभद्राचार्य यांनी साहित्य आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या गौरवशाली जीवनापासून प्रेरणा घेऊन भावी पिढ्या साहित्य निर्मिती, समाज-निर्माण आणि राष्ट्र-निर्माणात योग्य मार्गावर पुढे जात राहतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
गुलजार हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी ओळखले जातात. आपल्या कवितांनी लोकप्रिय असलेल्या गुलजार यांना २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता.
२०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण आणि त्याशिवाय पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आता ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी ५८वा ज्ञानपीठ पुरस्कार गुलजार यांना जाहीर केला आहे.