भुवनेश्वर : सामान्यतः संथ गतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कासवाने केलेल्या एका धाडसी प्रवासामुळे संपूर्ण देशात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ओडिशा राज्यातील गहिरमाथा समुद्रकिनाऱ्यावरून निघालेल्या एका ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने अवघ्या ५१ दिवसांत तब्बल १००० किलोमीटरचे अंतर पार करत आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहे.
या कासवाला उपग्रह आधारित ट्रॅकिंग यंत्राद्वारे टॅग करण्यात आले होते. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. भारतीय वन्यजीव संस्था आणि ओडिशा वन विभाग यांच्या संयुक्त अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. या इवल्याश्या कासवाने अंडी देण्यासाठी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर आपले ठिकाण निश्चित केले.
ही माहिती ओडिशाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रेम शंकर झा यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या ही उपग्रह प्रणाली अनेक कासवांवर कार्यरत असून त्याद्वारे स्थलांतराचे मार्ग, प्रजननाच्या ठिकाणांबद्दलची माहिती आणि सागरी परिसंस्थेतील बदल यांचा मागोवा घेतला जात आहे.
कासव टॅगिंग मोहिमेचा उद्देश
कासवांच्या स्थलांतर, प्रजनन सवयी, आहारासाठी निवडलेल्या भागांबद्दल माहिती मिळवण्यासाठी १९९९ मध्ये टॅगिंग मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. काही काळ ही मोहीम थांबली होती, मात्र २०२१ पासून भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाने ती पुन्हा सुरू केली. दरवर्षी सुमारे ३००० कासवांना टॅग केले जाते. २०२६ पर्यंत एकूण १ लाख कासवांना टॅग करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये त्यांची हालचाल, आरोग्य, वयोमानानुसार बदल आणि सागरी परिसंस्थेतील सहभाग यांचा अभ्यास केला जातो.
महाराष्ट्रातील कासवांचाही उल्लेखनीय प्रवास
केवळ आंध्र प्रदेशच नाही, तर गहिरमाथा किनाऱ्यावरून स्थलांतर करून आलेल्या कासवांनी महाराष्ट्रातही अंडी दिल्याचे उदाहरणे आढळून आली आहेत. २०२४ मध्ये एक टॅग केलेले कासव रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आणि तिथे अंडी घातल्याची नोंद आहे. या कासवाने जवळपास ३५०० किलोमीटर अंतर पार केले होते.
त्याचप्रमाणे पुरी जिल्ह्यातील देवी नदीच्या मुखाजवळ आणि गंजम जिल्ह्यातील रुशिकुल्या नदीच्या मुखाजवळही ऑलिव्ह रिडले कासव दरवर्षी हजारोंच्या संख्येने एकत्र येतात आणि घरटी बांधतात.
पूर्वीच्या स्थलांतराच्या महत्त्वाच्या नोंदी
*२००१: गहिरमाथाहून श्रीलंकेपर्यंत १००० किमी प्रवास करणारे कासव पहिल्यांदाच ट्रॅक झाले.
*२०१२: टॅग केलेले एक कासव गहिरमाथाहून अंदमान-निकोबार बेटांपर्यंत गेले होते.
*२०२३: एका कासवाने ओडिशाहून केरळ किनाऱ्यापर्यंत १५०० किमी प्रवास केला.
*२०२५: ३५०० किमीचे अंतर पार करून एक ऑलिव रिडले प्रजातीची मादी कासव ओडिशाहून महाराष्ट्रातील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्याची नोंद.
जैवविविधतेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
या मोहिमेमुळे कासवांच्या सागरी जीवनशैलीबद्दल अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळत आहे. पर्यावरणातील बदल, मानवी हस्तक्षेप व हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या अभ्यासातून असेही लक्षात आले आहे की कासव अंडी देण्यासाठी विशिष्ट भागांची निवड अत्यंत काटेकोरपणे करते. त्यामुळे समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आणि कासवांच्या संरक्षणासाठी हा अभ्यास मोलाचा ठरत आहे.