'अटल आसरा'चे पैसे निवाऱ्यासाठीच वापरा, योजनेचा गैरफायदा नको! मुख्यमंत्र्यांची सक्त ताकीद

'अटल आसरा' योजनेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन; १५ जूनपर्यंत सर्व अर्ज निकालात काढणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
'अटल आसरा'चे पैसे निवाऱ्यासाठीच वापरा, योजनेचा गैरफायदा नको! मुख्यमंत्र्यांची सक्त ताकीद

डिचोली: 'अटल आसरा'चे सर्व अर्ज १५ जूनपर्यंत निकालात काढण्यात येणार असून लाभधारकांच्या खात्यावर ते जमा करण्यात येतील. गरजूंना घरे उभारण्यासाठी दीड लाखाची रक्कम देण्याची योजना आहे, मात्र सरकारी योजनेचा गैरफायदा घेतल्यास कारवाई करण्यास सरकार मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. 

समाजकल्याण खात्यातर्फे 'अटल आसरा' योजनेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन रवींद्र भवन साखळी येथे करण्यात आले होते. ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा लाभ धारकांना तसेच सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी बोलवून त्यांचे अर्ज मंजूर करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

सरकार अनेक योजना आखत असून काहीजण मात्र त्या योजनांचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यांना निवाऱ्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, तसेच ज्यांचे उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे, अशा लोकांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सरकारतर्फे अटल आसरा योजनेअंतर्गत दीड लाख रुपये देण्याची तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार राज्यात विविध ठिकाणी अटल आसरा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 'सरकार तुमच्या दारी' योजनेअंतर्गत तातडीने सर्व दाखले उपलब्ध व्हावेत व कोणाचेही अर्ज प्रलंबित राहू नयेत. त्रुटी असतील तर त्या दूर कराव्यात हा या शिबिरांचा उद्देश असून राज्यातील सर्व अर्ज निकालात काढण्यात येतील, असे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी सांगितले.

या शिबिरावेळी अनेक अर्जदार उपस्थित असून समाजकल्याण खात्याचे अजित पंचवाडकर तसेच इतर अधिकारी, नगरसेवक, सरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

समाजकल्याण खात्याची अभिनव कल्पना  
ज्या काही गोष्टी किंवा त्रुटी होत्या, त्या दूर करण्यासाठी राज्यभरात अटल आसरा शिबिराचे आयोजन करून एकाच छताखाली सर्व अधिकाऱ्यांना बोलावून सर्व कागदपत्रांची छाननी व अर्जाला मान्यता देण्याची ही समाज कल्याण खात्याची कल्पना अभिनव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शिबिरावेळी सांगितले.  

हेही वाचा