रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील केदारनाथ येथे शनिवारी सकाळी एक एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर कोसळले, मात्र हेलिकॉप्टरमधील पायलट, डॉक्टर आणि नर्स सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार हे हेलिकॉप्टर ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयातून एक रुग्ण घेण्यासाठी केदारनाथकडे जात होते. मात्र, लँडिंग करत असताना हेलिकॉप्टर अचानक अनियंत्रित झाले आणि जमिनीवर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरचा मागचा भाग (टेल बूम) तुटला, मात्र प्रचंड दक्षता घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
एम्स रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर एक रुग्ण घेण्यासाठी केदारनाथमध्ये आले होते. पण हेलीपॅडपासून काही अंतरावरच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.
मागील आठवड्यातील दुर्घटना अजूनही ताजी
यापूर्वी, ८ मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात पायलट आणि एकाच कुटुंबातील आई-मुलगी यांचा समावेश होता. गंगोत्री धामकडे जात असलेल्या त्या हेलिकॉप्टरचे गंगनानीजवळील भागीरथी नदीच्या परिसरात अपघातग्रस्त झाले होते. ही सेवा एरोटांस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (अहमदाबाद) या खासगी कंपनीची होती आणि Bell VT-QXF प्रकारचे ७ सीटर हेलिकॉप्टर होते.