जरूर वाचा, इतिहास रचणाऱ्या पाकिस्तानच्या कशिश चौधरीची कहाणी
इस्लामाबादः फुटीरतावादाच्या वादळाशी झुंजणाऱ्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात कशिश चौधरी नावाच्या एका हिंदू मुलीने इतिहास रचला आहे. कशिश चौधरी या सहाय्यक आयुक्त बनणाऱ्या राज्यातील पहिल्या हिंदू आणि अल्पसंख्याक महिला ठरल्या आहेत. त्याच्या या कामगिरीची पाकिस्तानात चर्चा होत आहे.
बलुचिस्तानमधील फुटीरतावादी सशस्त्र चळवळीने वेग घेतला असून याच दरम्यान २५ वर्षीय कशिश चौधरी यांची सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यामुळे चर्चांना वेग आला आहे. कशिश चौधरी यांचे वय केवळ २५ वर्षे असून, त्या बलुचिस्तानातील चागई जिल्ह्यातील नोशकी या दुर्गम भागातील रहिवासी आहेत. बलुचिस्तान लोकसेवा आयोग (बीपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच कशिश आणि तिचे वडील गिरधारी लाल यांनी क्वेटा येथे बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री बुगती यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान कशिश म्हणाल्या, 'त्या महिला आणि अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रांताच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहेत.' कशिश यांच्यामुळे अनेक हिंदू महिलांमध्ये प्रेरणा निर्माण केली आहे.
समाज बदलाचे पाऊल
कशिश यांनी पुरुषप्रधान व्यवसायांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. गेल्या काही काळात अनेक हिंदू महिला सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक अडथळ्यांना मागे टाकत महत्त्वाच्या पदांवर पोहोचल्या आहेत. हिंदू समुदायातील अनेक महिलांनी अशा भूमिका स्वीकारत समाज बदलाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
परिश्रमाचे चीज झाले
"माझी मुलगी तिच्या कठोर परिश्रम आणि सातत्यामुळे सहाय्यक आयुक्त बनली आहे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तिने घेतलेल्या परिश्रमाचे आज चीज झाले" असे माध्यमांशी बोलताना कशिशचे वडील गिरधारी लाल यांनी सांगितले.
अल्पसंख्याक समुदायाचा वाढता भाग
पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक गट आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सुमारे ७.५ लाख हिंदू देशात राहतात. तथापि, समुदायाच्या अंदाजानुसार ही संख्या ९.० लाखांपेक्षा जास्त आहे. प्रशासकीय विभागात या भागातील अल्पसंख्यांक आपल्या परिश्रमाच्या जोरावर यश मिळवत आहेत. पाकिस्तानची बहुतेक हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात राहते. याच प्रांतातील सुमन पवन बोडानी या सध्या शाहदादकोट दिवाणी न्यायाधीश म्हणून म्हणून कार्यरत आहेत. सिंधमध्ये अल्पवयीन आणि तरुण हिंदू मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतरण यांसारख्या समस्या दिसून येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हिंदू समुदायासाठी शिक्षण सुविधा सुधारल्यास या समस्यांवर मात करण्यास मदत मिळू शकते, असेही त्या म्हणाल्या.