'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकार करणार पाकिस्तानची पोलखोल
नवी दिल्लीः भारताचा ऑपरेशन सिंदूर हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून भारताने पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर उघडे पाडण्याची तयारी केली आहे. या संदर्भात, पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी, भारतातील सात सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहे. या शिष्टमंडळासाठी मोदी सरकारने जाहीर केलेल्या खासदारांच्या नावांमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि तिरुवनंतपुरमचे लोकसभा खासदार शशी थरूर यांचा समावेश आहे.
काँग्रेसकडून पाठवण्यात आलेल्या यादीत माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आनंद शर्मा, लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई, राज्यसभा खासदार डॉ. सय्यद नासीर हुसेन आणि लोकसभेतील खासदार राजा ब्रार या चारजणांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, जयराम रमेश यांच्यामते काँग्रेसकडून सादर केलेल्या यादीत तिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांचे नाव नव्हते.
'या' सात खासदारांचा शिष्टमंडळात समोवश-
परदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी मोदी सरकारने सात खासदारांचे एक शिष्टमंडळ तयार केले आहे. यामध्ये शशी थरूर यांच्याशिवाय भाजपचे रविशंकर प्रसाद, जेडीयूचे खासदार संजय झा, भाजपचे खासदार बैजयंत पांडा, द्रमुकच्या खासदार कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावांचा समावेश आहे.
'यासाठी' होणार परदेश दौरा-
परदेश दौऱ्यादरम्यान, हे शिष्टमंडळ भारत दहशतवादाविरुद्ध कसा लढत आहे आणि संपूर्ण जग दहशतवादाविरुद्ध का एकत्र आहे हे स्पष्ट करेल. केंद्र सरकार पहिल्यांदाच अशा प्रकारे अनेक पक्षांच्या खासदारांना परदेश दौऱ्यावर पाठवत आहे.
काश्मीरबाबत भारताची भूमिका स्पष्ट करणे तसेच सीमावर्ती दहशतवाद आणि पाकिस्तानची दहशतवादी भूमिका अधोरेखित करणे हा त्याचा उद्देश आहे.