भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) जहाजांमध्ये क्षारीकरण संयंत्रासाठी तंत्रज्ञान करण्यात आले विकसित
कानपूर : सध्या सर्वत्र पाणी टंचाई हा विषय गंभीर बनत आहे. मागील काही वर्षांपासून वाढत्या शहरीकरणामुळे जलसाठे संपत चालले असून ग्रामीण भागात पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागतेय. खरं तर पृथ्वीवर ७१ टक्के पाणी आहे, पण ते खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात असल्यामुळे त्याचा पिण्यासाठी किंवा दैनंदिन वापरासाठी केला जात नाही.
कित्येक वर्ष समुद्राचं खारं पाणी गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी संशोधन सुरू होते, मात्र त्याला यश आले नव्हते. आता संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (डीआरडीओ) कानपूर येथील प्रयोगशाळेने केवळ ८ महिन्यांत नॅनोपोरस मल्टीलेयर्ड पॉलिमर मेम्ब्रेन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यामुळे समुद्राचे पाणी फिल्टर करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याच्या समस्येवर मात करता येणार असल्याचे बोलले जातेय.
संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) समुद्राच्या खारट पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्यासाठी उच्च-दाब समुद्राच्या पाण्याचे क्षारीकरण करण्यासाठी स्वदेशी नॅनोपोरस बहुस्तरीय पॉलिमरिक पडदा यशस्वीरित्या विकसित केला आहे.
डीआरडीओची कानपूर-स्थित प्रयोगशाळेत डिफेन्स मटेरियल स्टोअर्स अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (डीएमएसआरडीई) ने भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) जहाजांमध्ये क्षारीकरण संयंत्रासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे.
सध्यातरी हे तंत्रज्ञान तटरक्षक दलापुरतेच केंद्रीत असले तरी भविष्यात भारतीय बोटींवर, खलाशांना समुद्रात पाणी पिण्यासाठी वापरता येण्याची शक्यता आहे. तसेच किनारी भागात राहणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पाणी टंचाईला तोंड देणे शक्य होणार आहे. विशेषतः भारतातील ज्या भागात पाण्याची प्रचंड कमतरता आहे, त्या भागांसाठी भविष्यात हे मिशन वरदान ठरू शकते.
ऑपरेशनल टेस्टिंगनंतर अंतिम मंजुरी
भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) ऑफशोर पेट्रोलिंग व्हेसलवर (ओपीव्ही) या स्वदेशी तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली आहे. सुरुवातीच्या सुरक्षा आणि कामगिरी चाचणीत ते पूर्णपणे यशस्वी झाले आहे. आता ५०० तासांच्या ऑपरेशनल टेस्टिंगनंतर त्याला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे.