पाकिस्तानच्या गोटात खळबळ

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून तालिबानचा एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर करण्याचा मनसुबा पाकिस्तानने सोडून द्यावा, असा स्पष्ट इशारा अफगाणिस्तानातून देण्यात आला होता.
बलुचिस्तान स्वातंत्र्याचा मुद्दा एकीकडे गाजत असताना आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही तालिबानच्या मंत्र्यांशी संवाद साधल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आहे. यामुळे पाकिस्तानच्या गोटात आता अस्वस्थता माजली आहे. गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आहे.
अफगाणी लोकांसोबत भारताची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. भारताने अफगाणिस्तानच्या विकासासाठी अनेकदा मदत केली आहे. आता यापुढे भारत अफगाणिस्तानातील पायाभूत सुविधांबाबत काय करता येईल यावर धोरण ठरवणार असल्याचे दोन्ही प्रमुख नेत्यांच्या चर्चेनंतर माहिती समोर आली आहे. आता व्यापार आणि इतर मुद्द्यांवर पुढील चर्चा होणार आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर पाकिस्तानात गहजब उडाला आहे.