२०२१ मध्ये क्रशरवर काम करणाऱ्या कामगाराने केला होता पत्नीचा खून
🔴 मडगाव : मायना-कुडतरी येथील सां जुझे दी आरियाल परिसरातील सावरीचो दांडो (ओलेमोल) येथे २०२१ साली पत्नीचा खून करणाऱ्या गुलशन तिर्की या कामगारास दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
👨💼 झारखंड येथून आलेला गुलशन तिर्की हा पत्नी बसंती तिर्कीसह सावरीचो दांडो येथील एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. तो येथील एका खाजगी क्रशर कंपनीत काम करत होता. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याने पत्नी बसंतीवर चाकूने हल्ला करत तिचा निर्घृण खून केला होता. घटनानंतर तो तिथून फरार झाला.
👮♂️ तत्कालीन पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी पाठलाग करत गुलशनला गुढी-चांदर परिसरातून अटक केली. तपासादरम्यान खून करण्यात वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला होता.
⚖️ या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. पुराव्यांच्या आधारे आरोपी गुलशन तिर्की यास दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनुसार, दंड न भरल्यास गुलशन तिर्की यास तीन वर्षांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. तसेच, ५ नोव्हेंबर २०२१ ते १६ मे २०२५ या कालावधीत आरोपी पोलीस कोठडीत किंवा न्यायालयीन कोठडीत असलेल्या काळाची गणना शिक्षेच्या कालावधीत करण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.