पदाचा ताबा सहाय्यक अभियंत्याकडे
मडगाव : मडगाव येथील वीज खात्याचे अधिकारी काशिनाथ शेट्ये यांना कार्यकारी अभियंता पदावरून मुक्त करण्यात आले आहे. याची माहिती शेट्ये यांनी समाजमाध्यमांवरून दिली. मडगाव येथील वीज कार्यालयात कार्यकारी अभियंता पदावर काशिनाथ शेट्ये कार्यरत होते.
शुक्रवारी शेटये यांनी आपल्या समाजमाध्यमावरील अकाऊंटवरून मडगाव कार्यालयातून पदावरून मुक्त करण्यात आल्याचे सांगितले. सध्या काशिनाथ शेट्ये यांच्याकडील पदाचा ताबा सहाय्यक अभियंत्याकडे देण्यात आला आहे. शेट्ये यांनी आपल्याला मडगाव येथील पदावरून मुक्त करण्यात आलेले असले, तरीही लढाई सुरूच राहील, असा संदेशही दिलेला आहे. काही दिवसांपूर्वी मडगावातील वीज खात्याच्या परिसरातील बेकादेशीर आस्थापनांना हटविण्याच्या मोहिमेला शेट्ये यांनी गती दिलेली होती. मडगाव पालिकेकडून बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई होत नसल्याने शेट्ये यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी वीज खात्याच्या खांबांवरील विविध केबल्स कापण्याच्या मोहिमेतही शेट्ये यांनी पुढाकार घेतला होता.