सारझोरा, ओर्ली, कार्मोणा, केळशी भागात पाणीपुरवठा खंडित
सारझोरा येथे जलवाहिनी फोडल्यामुळे पाणी वाया गेले.
मडगाव : वीज खात्याकडून भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू असताना दोन जलवाहिन्या फोडण्यात आल्या. यामुळे सासष्टी तालुक्यातील सारझोरा, ओर्ली, कार्मोणा, केळशी आदी भागात पाण्याचा पुरवठा खंडित झाला आहे.
वीज खात्याकडून भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम केले जात आहे. या कामावेळी अनेक ठिकाणी खोदकाम करताना जलवाहिन्या फोडल्या जात आहेत. त्यामुळे लोकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेले काही दिवस किनारी भागातील लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे लोकांनी नाराजीही व्यक्त करत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आता पुन्हा एकदा सारझोरा येथील खोदकाम करताना वीज खात्याकडून जलवाहिन्या फोडण्यात आल्या आहेत. लोकांनी पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगताच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
सारझोरा सरपंच मास्करेन्हास यांनी सांगितले की, वीज खात्याकडून वाहिन्या घालण्यासाठी नेमलेला ठेकेदार थेट खोदकामाला सुरुवात करताे. या ठिकाणी जमिनीत आणखी काही वाहिन्या आहेत का, याची माहिती त्यांना देण्यात येत नाही. त्यामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. याचा त्रास लोकांना होत आहे. सरकारने कामाचा ठेका देण्याआधी वाहिन्यांची माहिती देण्याची गरज आहे.