१.६३ लाखांहून अधिक महिलांची तपासणी : ३,३०० हून अधिक महिला कर्करोगासाठी संशयित; ७० जणींमध्ये आजाराचे निदान
🎗️ पणजी : आरोग्य खात्यातर्फे 'स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यातील १ लाख ६३ हजारहून अधिक महिलांची स्तनांच्या कर्करोगासाठी चाचणी करण्यात आली आहे.
या चाचण्या वेदनारहित आयईबी उपकरणाद्वारे करण्यात आल्या. यामध्ये ३,३०० हून अधिक महिला कर्करोगासाठी संशयित आढळल्या आहेत. तर ७० जणींना कर्करोगाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.
प्राथमिक तसेच कम्युनिटी आरोग्य केंद्रांमध्ये स्तनांच्या कर्करोगासाठी मोफत चाचणी केली जात आहे. यामुळे कर्करोगाची लक्षणे त्वरित ओळखून उपचार सुरू करणे शक्य झाले आहे. प्राथमिक टप्प्यात उपचार सुरू झाल्यास रुग्णाचा जीव वाचवता येणे सुकर बनते. 🏥
या उपक्रमांतर्गत सुरुवातीला दोन वर्षांच्या कालावधीत १ लाख महिलांची तपासणी करण्यात येणार होती. यानंतर या उपक्रमाचा कालावधी वाढवण्यात आला होता. यामध्ये स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणीसह, याबाबतीत जागृती करणे, शिक्षित करणे यांचाही समावेश आहे. सध्या या उपक्रमातून राज्यातील एकूण २.५ लाख महिलांची चाचणी करण्याचा उद्देश आहे. 💗
राज्यात २०२० ते २०२४ दरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) आढळलेल्या अन्य कर्करोगाच्या रुग्णांच्या तुलनेत स्तनांचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. या कालावधीत एकूण ५,८१६ कर्करोगाचे रुग्ण आढळले होते.
राज्यात २०१४ ते २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीत महिन्याला सरासरी ८ महिलांचा स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये सर्वाधिक ११० महिला मृत्यू पावल्या.
🎀 स्तन कर्करोग जागृती मोहीम - पहिल्या टप्प्यातच निदान आणि उपचार 🎀