वैयक्तिक अहवाल सरकारला बांधिल नाही; सुभाष शिरोडकर
🔵 पणजी : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) जारी केलेल्या अहवालाचा अभ्यास करूनच आपण त्यावर भाष्य करू, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर, असे वैयक्तिक अहवाल सरकारला बांधिल नसतात. म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्यास त्याचा गोव्याला फटका बसणार असल्यामुळेच आम्ही त्याविरोधात लढत असल्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी नमूद केले.
🌊 म्हादई पाणी तंटा लवादाच्या अंतिम आदेशानुसार, म्हादई नदीचे पाणी वळवल्यास त्याचा संपूर्ण गोव्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचा अहवाल 'एनआयओ'ने नुकताच जारी केला. 'एनआयओ'चे शास्त्रज्ञ के. अनिल कुमार, डी. शंकर आणि के. सुप्रित यांनी हा अहवाल तयार केला आहे.
⚡ हा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब आणि आमदार विरेश बोरकर यांनी आक्रमक होत, 'एनआयओ'च्या कार्यालयाबाहेर आंदोलनही केले.
🗣️ या पार्श्वभूमीवर बोलताना, 'एनआयओ'च्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच आपण त्यावर बोलू, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. तर, अशा प्रकारचे अनेक अहवाल येत असतात. पण सरकार त्याबाबत बांधिल नसते. कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळवण्यास त्याचे परिणाम गोव्यावर होणार असल्यामुळेच सरकार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही लढत असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी स्पष्ट केले.
'एनआयओ'चा अहवाल आल्यानंतर जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी या अहवालाचा अभ्यास करून त्याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी चर्चा करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही. याचाच अर्थ राज्य सरकार या विषयावरून गोमंतकीय जनतेची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका 'आरजीपी'चे अध्यक्ष मनोज परब यांनी केली. बदामी हे मूळ कर्नाटकातील आहेत. त्यामुळे म्हादई प्रकरणात ते कर्नाटकचीच बाजू घेत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.