श्रवण बर्वे खून प्रकरणी वासुदेव ओझरेकरला अटक

वडील, भावालाही रात्री उशिरा झाली अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th April, 12:31 am
श्रवण बर्वे खून प्रकरणी  वासुदेव ओझरेकरला अटक

वाळपई : आंबेडे-नगरगाव येथील श्रवण बर्वे (२४) खून प्रकरणी वाळपई पोलिसांनी संशयित वासुदेव नकुळ ओझरेकर (४२) याला शुक्रवारी रात्री अटक केली. श्रवणचे वडील देविदास आणि भाऊ उदय यांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. वासुदेवच्या मदतीने श्रवणचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. 

नगरगाव येथील श्रवण बर्वे या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी संशयास्पद अवस्थेत त्याच्या घरासमोर आढळून आला होता. याबाबत बर्वे कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनुसार वाळपई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा पंचनामा केला. दरम्यान या प्रकरणाचा सविस्तर तपास केल्यानंतर पोलिसांनी १८ स्थानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यातील काहींना चौकशी करून सोडून देण्यात आले. मात्र, तिघांना अधिक चौकशीसाठी पर्वरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यामध्ये वासुदेव ओझरेकर याच्यासह त्याच्या २ मुलांचा समावेश होता. स्थानिकांनी वाळपई पोलीस स्थानकावर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे वासुदेव वगळता त्यांच्या दोन्ही मुलांना उशिरा सोडण्यात आले. दरम्यान, बर्वे कुटुंबीयांनी संशयितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सखोल चौकशीनंतर संशयिताला अटक

वासुदेव ओझरेकर याची शुक्रवारी सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत तो संशयित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. खूनप्रकरणात त्यांच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे सापडल्यामुळे त्याला अटक केल्याची  माहिती पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.


हेही वाचा