कला अकादमीच्या थिएटरमधील ध्वनी यंत्रणा, प्रकाश योजनेचे तांत्रिक ऑडिट त्वरित व्हायला हवे. तज्ज्ञांच्या समितीने आपल्या अहवालात त्याविषयी सूचना केल्या तर त्या आधारे सरकारने त्वरित दुरुस्तीचे काम हाती घ्यायला हवे.
सुमारे ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करून कला अकादमीची दुरुस्ती केली. दुरुस्तीनंतरही अनेक दोष राहिले त्याची वारंवार कलाकारांनी सरकारला जाणीव करून दिली. अमुक कलाकार म्हणतो किंवा आरोप करतो म्हणजे ते राजकारण, असे समजून सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केले. गोव्यातील कला अकादमीची वास्तू ही देशात नावलौकिक असलेली. त्या वास्तूचे दोष दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेतला हे योग्यच होते. कारण ती जुनी झाल्यामुळे अनेक ठिकाणी तिला गळती लागली होती. ते दोष दूर करताना अकादमीच्या मूळ ढाच्यात असलेल्या चांगल्या गोष्टींचीही दुर्दशा करण्यात आली. दुरुस्तीवेळी जी ध्वनी, प्रकाश योजना आणि रंगमंचाच्या कामात बदल केले गेले तेच दुरुस्त करायला बहुतेक जास्त खर्च येईल अशी स्थिती आहे. कारण दरवेळी नव्या त्रुटी समोर येत आहेत. गेले काही महिने कला अकादमीच्या दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबाबत कलाकारांनी आवाज उठवूनही सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन लवकर आवश्यक दुरुस्त्या कराव्या यासाठी काहीच उपाय केले नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ कलाकारांचे एक कृती दल स्थापन केले. विजय केंकरे सारखे दिग्गज नाटककार या दलाचे प्रमुख आहेत. दलाने सरकारला आपला अंतिम अहवाल दिला नसला तरी अकादमीच्या दुरुस्ती कामातील त्रुटी त्यांनी सांगितलेल्या आहेत. सरकारने अद्याप काही कार्यवाही केलेली नाही. कदाचित कृती दलाच्या अंतिम अहवालाची सरकार वाट पाहत असावे. दुरुस्तीतील दोष सुधारले नसल्यामुळे शरद पोंक्षे यांच्या नाटकावेळी प्रकाश योजनेत आलेल्या अडथळ्यानंतर सरकारवर विशेषतः कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर टीका सुरू झाली. ही टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे म्हणता येणार नाही. कारण अनेक प्रेक्षक या नाटकावेळी प्रकाश योजनेतील त्रुटी पाहून नाराज झाले. पोंक्षे यांनी काहीवेळ नाटक थांबवून क्षमा मागून त्रुटी दूर करून पुन्हा नाटक सुरू केले. या घटनेवेळी सभागृहात कला अकादमीच्या दुरुस्ती विषयी प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली. ती चर्चा दुसऱ्या दिवशी समाज माध्यमांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये दिसून आली.
प्रकाश योजनेत त्रुटी आहेत हे शरद पोंक्षे यांनी सांगण्यापर्यंत कला अकादमीने वाट पाहण्याचीही गरज नव्हती, कारण हल्लीच अकादमीच्या ‘अ’ गट नाट्य स्पर्धेलाही भाड्याची प्रकाश योजना आणावी लागली होती. यावरून अकादमीलाही या त्रुटी मान्य आहेत. मग अकादमीने नाटकाच्या आयोजकांना याची कल्पना दिली होती का, असा प्रश्न उपस्थित होतो. पोंक्षे म्हणतात त्याप्रमाणे अकादमीचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नाही, त्यात तथ्य आहे. गोव्यातील कलाकारांनी सरकारला त्रुटी दाखवल्या त्यावेळी सरकारने त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. आता शरद पोंक्षे सारख्या अभिनेत्यालाही कला अकादमीच्या प्रकाश योजनेचा वाईट अनुभव आला. त्यापूर्वी विजय केंकरे यांच्या नेतृत्वाखालील कृती दलाने अकादमीच्या कामाचा पूर्ण पंचनामा केला आहे. समितीने ध्वनी, प्रकाश योजना आणि रंगमंचामधील त्रुटी शोधून त्यावर काम करण्यासाठी शीतल तळपदे, रॉजर ड्रेगो आणि राजन भिसे या तीन तज्ज्ञांची शिफारसही केली आहे; ज्यांची सार्वजनिक बांधकाम खात्याने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या सूचनांवर सरकारने त्वरित कार्यवाही करून अकादमीच्या थिएटरमध्ये आवश्यक असलेल्या दुरुस्त्या तत्काळ करायला हव्या. केंकरे यांनी यापूर्वी बोलताना कला अकादमीचे व्यासपीठ, ध्वनी यंत्रणा, एसीसह एकंदर सर्वच कामे सदोष आहेत असे म्हटले होते. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काही कामे नव्याने करावी लागणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
कला अकादमीच्या थिएटरमधील ध्वनी यंत्रणा, प्रकाश योजनेचे तांत्रिक ऑडिट त्वरित व्हायला हवे. तज्ज्ञांच्या समितीने आपल्या अहवालात त्याविषयी सूचना केल्या तर त्या आधारे सरकारने त्वरित दुरुस्तीचे काम हाती घ्यायला हवे. तोपर्यंत थिएटर भाडेपट्टीवर देताना त्रुटींची कल्पना संबंधित कार्यक्रमांच्या आयोजकांना द्यावी. म्हणजे शरद पोंक्षे यांना जो अनुभव आला तो यापुढे अन्य कोणाला येऊ नये. दुसऱ्या बाजूने कृती दलाने तीन तज्ज्ञांची जी शिफारस केली आहे, त्या तज्ज्ञांच्या मदतीने अकादमीच्या थिएटरमधील त्रुटी शक्य तितक्या लवकर दूर कराव्यात. जेवढा उशीर या कामात होईल तेवढा हा विषय ताणला जाईल. ज्यातून राज्याची बदनामी होतेच, शिवाय प्रेक्षकांची कला अकादमीशी असलेली ओढही नाहीशी होईल.