गुजरातची बंगळुरूवर घरच्या मैदानात मात

आरसीबीचा आठ विकेटने धुव्वा : बटलर-सुदर्शनची मॅरेथॉन भागीदारी, सिराज सामनावीर

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd April, 12:36 am
गुजरातची बंगळुरूवर घरच्या मैदानात मात

बंगळुरू : एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीनंतर साई सुदर्शन आणि जोस बटलरच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर गुजरातने आरसीबीचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने लियाम लिव्हिंगस्टोनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, गुजरातने १७.५ षटकांत दोन गडी गमावून १७० धावा करत सामना जिंकला.
बंगळुरूने दिलेल्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा कर्णधार शुबमन गिल झटपट बाद झाला. पण, यानंतर साई सुदर्शन-जोस बटलर जोडीने दुसर्‍या विकेटसाठी ४७ चेंडूत ७५ धावांची भागीदारी करत बंगळुरूच्या गोलंदाजांना निरुत्तर केले. हेझलवूडने सुदर्शनला बाद केले. सुदर्शन बाद झाल्यावर बटलरने सामन्याची सूत्रे हाती घेतली. शेरफन रुदरफोर्डने त्याला चांगली साथ देत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात बटलरने ३९ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. तर रुदरफोर्डने १८ चेंडूत ३० धावांची खेळी करत बटलरला चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आणि गुजरात टायटन्स यांच्यातील एम. चिन्नास्वामी स्टेडियम खेळविण्यात आलेल्या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा केल्या आणि गुजरातला विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य दिले.
गुजरातविरुद्ध आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचे अव्वल फलंदाज विराट कोहली, देवदत्त पडिकल, फिल साॅल्ट आणि कर्णधार रजत पाटीदार लवकर बाद झाले. यानंतर, लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा आणि टिम डेव्हिड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर, आरसीबीने २० षटकांत ८ गडी गमावून १६९ धावा केल्या.
आरसीबीचा स्टार फलंदाज आणि सलामीवीर विराट कोहली गुजरातविरुद्ध मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आणि तो ६ चेंडूत ७ धावा काढून बाद झाला. कोहलीला अर्शद खानने बाद केले. देवदत्त पडिक्कल ४ धावांवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. सिराजने साॅल्टला १४ धावांवर बाद केले. कर्णधार रजत पाटीदारला इशांत शर्माने १२ धावांवर एलबीडब्ल्यू बाद केले. ३३ धावांवर साई किशोरच्या चेंडूवर जितेश शर्माला तेवतियाने झेलबाद केले. या सामन्यात कृणाल पंड्या ५ धावांवर बाद झाला. लियाम लिव्हिंगस्टोनने ३९ चेंडूत सलग दोन षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. पण तो ५४ धावा काढल्यानंतर झेलबाद झाला. फिल सॉल्टने १८ चेंडूत ३२ धावांची जलद खेळी केली. त्याला प्रसिद्ध कृष्णाने बोल्ड केले. गुजरातकडून मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली आणि सर्वाधिक ३ बळी घेतले तर साई किशोरने २ विकेट्स घेतल्या.

किंग कोहली ठरला अर्शद खानचा बळी
गुुजरात टायटन्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शद खानने किंग कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला. अर्शदने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला फक्त ७ धावांवर बाद केले. अर्शद खानने विराटला शॉर्ट ऑफ पिच बॉल टाकला जो तो नियंत्रित करू शकला नाही आणि प्रसिद्ध कृष्णाने डीप फाइन लेगवर त्याचा झेल घेतला.

बंगळुरू अव्वल स्थानावरून तिसऱ्या स्थानी
आयपीएलच्या चालू हंगामातील गुजरातचा हा सलग दुसरा विजय आहे, तर आरसीबीला सलग दोन सामने जिंकल्यानंतर पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघ पॉइंट्स टेबलच्या अव्वल स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला. त्याचा नेट रन रेट १.१४९ राहिला. दरम्यान, गुजरात चार गुणांसह आणि ०.८०७ च्या नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर पंजाब किंग्ज चार गुणांसह आणि १.४८५ च्या नेट रन रेटसह आहे.
........
संक्षिप्त धावफलक
बंगळुरू : २० षटकांत ८ बाद १६९ धावा
गुजरात : १७.५ षटकांत २ बाद १७० धावा
सामनावीर : मोहम्मद सिराज