यशस्वी जयस्वालचा गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय

आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत करणार गोव्याचे प्रतिनिधित्व

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd April, 12:26 am
यशस्वी जयस्वालचा गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय

मुंबई : टीम इंडियाचा तरुण तडफदार धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालने मुंबई संघाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी डोमेस्टिक हंगामात यशस्वी गोवा रणजी संघाकडून खेळताना दिसणार आहे. यशस्वीने यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळविले आहे. यशस्वीच्या निर्णयाने एमसीएचे पदाधिकारी आश्चर्यचकित झाले. पण, त्यांनी त्याला ना हरकत प्रमाणपत्र जारी केले आहे. यामुळे यशस्वीचा गोव्यासाठी खेळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. डोमेस्टिक क्रिकेटमधल्या चॅम्पियन संघाऐवजी गोव्याकडून खेळण्याचे कारण यशस्वीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शंभू देसाई यांनी जयस्वालशी चर्चा केली. कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारात यशस्वीने धावांची बरसात केली आहे. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने त्याला १८ कोटी रुपये खर्चून रिटेन केले आहे. आम्ही एक चांगला संघ उभारू इच्छितो. देशातील सर्वोत्तम प्रतिभाशाली खेळाडू गोव्याकडून खेळावेत, असा आमचा प्रयत्न आहे. या विचारातूनच आम्ही यशस्वीशी संवाद साधला, असे देसाई यांनी सांगितले.

डोमेस्टिक क्रिकेटमधील यशस्वीची कारकीर्द
- डोमेस्टिक क्रिकेटमध्ये यशस्वीने ३६ प्रथम श्रेणी सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. ६०.८५च्या सरासरीने त्याने ३,७१२ धावा केल्या आहेत.
- २०१९ मध्ये त्याने मुंबईसाठी पदार्पण केले होते. उत्तर प्रदेशातल्या भदोही येथून मुंबईला येऊन आझाद मैदानाजवळच्या तंबूत राहून यशस्वीने क्रिकेटची आवड जोपासली होती.
- मुंबईतल्या मैदानांवर यशस्वीची बॅट सातत्याने तळपत आहे. २०२० मध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वी मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
- २०२१-२२ या पहिल्यावहिल्या रणजी हंगामात यशस्वीने मुंबईसाठी तीन शतके झळकावली. मुंबईसाठी खेळताना लिस्ट ए सामन्यात त्याने ३३ सामन्यांत १,५२६ धावा केल्या आहेत.