राज्यातील गर्भवती महिलांच्या मृत्यू दरात दीडपटीने घट

आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल २०२४-२५ : नवजात शिशूंच्या मृत्यू दरात वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st March, 12:13 am
राज्यातील गर्भवती महिलांच्या मृत्यू दरात दीडपटीने घट

पणजी : राज्यात एका वर्षात गर्भवती महिलांच्या मृत्यू दरात दीडपटीने घट झाली आहे. या मृत्यू दरामध्ये गर्भधारणेदरम्यान अथवा मुलाला जन्म देताना वैद्यकीय समस्या निर्माण झाल्याने होणाऱ्या महिलांच्या मृत्यूंची नोंद केली जाते. दर १ लाख शिशूंच्या जन्मामागे किती गर्भवती महिलांचा मृत्यू झाला याची माहिती जमा केली जाते. यानुसार २०२२ मध्ये दर १ लाख शिशूंच्या जन्मामागे ५८ गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये ही संख्या कमी होऊन ३५ झाली. राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल २०२४-२५ मधून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार राज्यात २०१९ मध्ये दर १ लाख शिशूंच्या जन्मामागे ४६ गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये ही संख्या वाढून ४९ झाली. २०२१ मध्ये कोविड आणि अन्य कारणांमुळे ही संख्या वाढून १२३ पर्यंत पोहोचली होती. २०१९ ते २०२३ मधील सर्वाधिक मृत्यू २०२१ मध्ये झाले होते. अहवालानुसार राज्यात २०२० ते २०२३ दरम्यान नवजात शिशूंच्या (एक वर्षाच्या आतील) मृत्यू दरात वाढ झाली आहे. २०२० मध्ये दर एक हजार जन्मामागे ९.१२ बालकांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये ही संख्या वाढून १०.७३ झाली होती.
वरील कालावधीत राज्यातील एकूण मृत्यू दरात देखील वाढ झाली आहे. २०१९ मध्ये राज्यात दर एक हजार व्यक्तींमागे ८.८९ जणांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये ही संख्या वाढून ९.५० इतकी झाली. २०२० मध्ये राज्यातील मृत्यू दर ९.३०, २०२१ मध्ये ११.५९ तर २०२२ मध्ये ९.४० इतका होता. वरील कालावधीत राज्यातील जन्म दर कमी झाला आहे. अहवालानुसार, २०१९ मध्ये दर एक हजार व्यक्तींमागे १२.६६ जणांचा जन्म झाला होता. २०२३ मध्ये हा दर कमी होऊन १०.७३ झाला.
लोकसंख्येची नैसर्गिक वाढ घटली
अहवालानुसार, राज्यात २०१९ ते २०२३ दरम्यान लोकसंख्येची नैसर्गिक वाढ घटली आहे. २०१९ मध्ये १९,७३६ जन्म, तर १३,८५१ मृत्यू झाले. त्यावर्षी लोकसंख्येची नैसर्गिक वाढ ५,८८५ होती. २०२३ मध्ये १७,२४० जन्म, तर १५,२६२ मृत्यू झाले. त्यावर्षी लोकसंख्येची नैसर्गिक वाढ १,९७८ होती. वरील कालावधीत राज्यातील लोकसंख्येची नैसर्गिक वाढ ३,९०७ ने कमी झाली.                                           

हेही वाचा