पणजी :साधनसुविधा व प्रगती यात भारत देश चीनच्या बरोबरीने मार्गक्रमण करीत आहे. काही काळाने भारत देश चीनला मागे टाकून जागतिक महासत्ता बनणार आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची गरज आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
साखळी येथील नववर्ष स्वागत समितीच्या शोभा यात्रेनंतर राधाकृष्ण मंदीरात झालेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले. साखळीसह राज्यातील समस्त नागरिकांना त्यानी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नववर्ष दिन प्रत्येक नागरिकाने कोणता ना कोणता नवा संकल्प करण्याची गरज आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत, आत्मनिर्भर भारत करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. याचबरोबर आम्हाला विकसित तसेच स्वयंपूर्ण गोवा करायचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यात आज मधूमेहासह इतर आजारांचे प्रमाण वाढत आहे. मुक्तीपूर्वी गोव्यात साखरेपेक्षा गुळाचे सेवन अधिक असायचे. कोणी पाहुणा घरात आला की साखरेऐवजी गुळ व पाणी देत असत. अलीकडच्या काळात आहारातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मधूमेहासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. आरोग्याची काळजी घेण्याचाही सल्ला नववर्षदिनी मुख्यमंत्र्यांनी दिला. यावेळी नववर्ष स्वागत समितीचे सदस्य, विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होती.