तब्बल ७० लाख रुपयांचे नुकसान
पणजी : अनमोड घाटात कोळसा वाहून नेणारा १६ चाकी ट्रक आगीत जळून भस्मसात झाला. या घटनेत ट्रकचे सर्व १६ टायर आणि कोळसाही जळून नष्ट झाला. फोंडा येथील अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले, परंतु तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. या दुर्घटनेत अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, हा ट्रक होस्पेट, कर्नाटक येथून गोव्यातील आमोणा येथे कोळसा वाहतूक करत होता. अनमोड घाटात गोवा हद्दीत मोलेजवळ ट्रकचा पुढील टायर पंक्चर झाल्यामुळे चालक टायर बदलत होता. त्याच वेळी मागील टायर फुटला आणि अचानक आगीचा भडका उडाला. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. याप्रकरणी मोले पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.