महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा न होणे हे लोकशाहीसाठी घातक
पणजी : खासदारांनी जनतेचे प्रश्न संसदेत उपस्थित करणे अपेक्षित असते. संसदेत विविध विरोधी पक्षांचे नेते ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या लोकसभा आणि राज्यसभा अधिवेशनात विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खासदार विरीयातो फर्नांडिस यांनी केला. शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सवियो डिसिल्वा आणि श्रीनिवास खलप उपस्थित होते.
संसदेच्या अधिवेशनात विरोधी नेत्यांचा बोलू दिले जात नाही. जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलण्यास उभे राहिल्यास त्यांचे माईक बंद केले जात आहेत. तसे त्यांच्यावरील कॅमेरे इतरत्र फिरवले जातात. घटनेनुसार संसदीय समित्यांची बैठक नियमितपणे होणे आवश्यक असते. मात्र सध्या या बैठका देखील वेळेवर होत नाहीत. लोकसभेत उद्या कोणते विषय येणार याची माहिती आदल्या दिवशी देण्याऐवजी ऐनवेळी दिली जात असल्याचे फर्नांडिस म्हणाले.
लोकसभेत २०१९ नंतर उपाध्यक्षांची निवड देखील करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पीय मागण्यांमध्ये महत्त्वाच्या खात्यांवर चर्चा झालेली नाही. शून्य प्रहरात देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होऊ दिली जात नाही. संसदीय समित्यांचे अध्यक्ष निवडताना विरोधी पक्षांना विश्वासात घेतले जात नाही.
या सर्व गोष्टी संसदीय लोकशाहीसाठी घातक ठरत आहेत. या गोष्टींकडे लक्ष देऊन संसद नियमानुसार चालवणे, कामकाजात पारदर्शकता आणणे आदी मागण्या लोकसभा अध्यक्षांना करण्यात आल्याचे फर्नांडिस म्हणाले.
गोव्याचे प्रश्न संसदेत उपस्थित करा
गोव्यात राजकीय आरक्षणाचे विधेयकावर मागील अधिवेशनात चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी ते मंजूर झाले नाही. सध्याच्या अधिवेशनात ते मंजूर होईल अशी आमची अपेक्षा आहे. मात्र ते देखील कामकाजामध्ये अद्याप आले नाही. संसदेत गोव्याचे तीन खासदार आहेत. यातील एक मंत्री आहेत. तिघांनी मिळून गोव्याचे प्रश्न संसदेत उपस्थित करणे आवश्यक असल्याचे विरीयातो फर्नांडिस यांनी सांगितले.
तियात्रावर खासगी विधेयक
तियात्र सामजिक संदेश देतात. एप्रिलमध्ये या कला प्रकाराला १३३ वर्षे पूर्ण होतील. तियात्राला युनेस्को दर्जा मिळावा, कलाकारांना निवृत्ती वेतन द्यावे , देशाबाहेर शो करण्यास अनुदान मिळावे यासाठी लोकसभेत खासगी विधेयक मांडणार असल्याचे विरीयातो फर्नांडिस यांनी सांगितले.