पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई होणार
पणजी : काँग्रेसमधून फुटून गेलेल्या एकाही आमदाराला आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा तसेच पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींनी घेतला असून, तसे निर्देश प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनाही देण्यात आले आहेत.
राहुल गांधी यांनी नुकतीच प्रत्येक राज्यातील एका जिल्हाध्यक्षासमवेत व्हर्च्युअल पद्धतीने बैठक घेतली. काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा या बैठकीला उपस्थित होते. सावियो डिसिल्वा यांनी प्रदेश काँग्रेसमधील सध्याचे वातावरण, पक्षाच्या विरोधात गुप्तपणे सुरू असलेल्या कारवायांची माहिती राहुल गांधी यांना दिली.
शिवाय काँग्रेसच्या उमेदवारीवरून निवडून येत नंतर भाजपात प्रवेश केलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्यास पक्षाला त्याचा मोठा फटका बसू शकतो, अशी भूमिकाही मांडली. यावर बोलताना, काँग्रेसशी गद्दारी केलेल्या एकाही आमदाराला आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
शिवाय पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांचा तत्काळ शोध घेऊन त्यांच्या कडक कारवाई करण्याचे किंबहुना त्यांना पक्षातून निलंबित करण्याचे निर्देश त्यांनी प्रभारी ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष पाटकर यांना दिलेले आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने शनिवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली. या बैठकीला माजी प्रदेशाध्यक्ष तथा वरिष्ठ नेते गिरीश चोडणकरही उपस्थित होते, असेही या नेत्याने सांगितले.
पक्षातील फूट वारंवार चव्हाट्यावर!
- गत विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने तरुण अमित पाटकर यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली. त्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये गिरीश चोडणकर आणि अमित पाटकर असे सरळ दोन गट पडले. पक्षातील ही फूट अजूनही वारंवार चव्हाट्यावर येत आहे.
- चोडणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जवळच्या अनेकांनी पक्षाकडे पाठ फिरवली. त्यामुळे काँग्रेसची अवस्था गलितगात्र झाली. अशा स्थितीतून पक्षाला बाहेर काढण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने अनुभवी, संयमी माणिकराव ठाकरे यांची प्रभारी म्हणून नेमणूक केली.
- ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकदा गोव्यात येऊन पक्षांतर्गत सुरू असलेली धुसफूस समजून घेतलेली आहे. त्यामुळे पुढील काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी ते कशाप्रकारचे निर्णय घेणार, याकडे राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष लागून आहे.