सिंधुदुर्गसह गोव्यातील काही जण जखमी
सावंतवाडी : कुडाळहून पणजीकडे जाणारी एसटी शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास इन्सुली घाटीत अपघातग्रस्त झाली. बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवत बसला डोंगराच्या दिशेने वळवत एसटी दरडीवर चढवल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालक व वाहकासह बसमधील सुमारे ३२ प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कुडाळ- पणजी ही एसटी इन्सुली घाटीतून खाली जात असताना गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे बस चालक सचिन धुडे यांच्या लक्षात आले. गाडीचा ताबा राखता येत नसल्याने तसेच एका बाजूला खोल दरी असल्याने चालकाने समय सूचकता व प्रसंगावधान राखून एसटी दरडीच्या बाजूने वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
जखमींमध्ये वृद्ध तसेच महिला, शालेय विद्यार्थी व लहान मुलांचाही समावेश होता. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातात बसचालक सचिन धुडे (वय ४४) यांच्या छातीला आणि वाहक दिनेश दत्ताराम शिरवलकर (वय ४७) यांच्या डोक्याला मार लागला. इतर जखमी प्रवाशांमध्ये हेमा संजय सावंत (५२, पणजी), रेगा बळवंत जाधव (७०, म्हापसा), गोविंद वेळीप (५९, गोवा), हेलार गोविंद वेळीप (३०, गोवा), आनंद रघुनाथ गावडे (४९, गोवा) आणि सिंधुदुर्गामधील प्रवाशांचा समावेश होता.
अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि वाहकांकडून घटनेची माहिती घेतली.
एसटी बस अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी बसस्थानकातून अधिकारी वर्गाने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. तसेच जखमींना प्रत्येकी ५०० रुपयांची तत्काळ मदतही केली. तसेच अन्य उपचारासाठी आवश्यक तरतूदही करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.