पणजी : ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी व इतर अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पणजी पोलिसांनी रामा काणकोणकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने रामा काणकोणकर याला ५० हजार रुपयांच्या हमीवर व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश प्रधान सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी दिला आहे.
या प्रकरणी श्याम परब आणि इतरांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित रामा काणकोणकर याने स्वामींच्या विरोधात विधान करून सोशल मीडियावर प्रसारित केले हाेते. या विधानाने काणकोणकर याने ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या प्रतिष्ठेला जाणूनबुजून हानी पोहोचवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे काणकोणकर याने स्वामी तसेच त्यांच्या अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावून अपमान केल्याचे तक्रारीत म्हटले होते. याची दखल घेऊन पणजी पोलिसांनी रामा काणकोणकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९, १९६, ३५३(२) आणि ३५६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. याच दरम्यान काणकोणकर याने मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने सुनावणी घेऊन काणकोणकरला ५० हजार रुपयांच्या हमी, पुढील पाच दिवस पोलीस स्थानकात हजेरी, ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीं विरोधात वक्तव्य किंवा व्हिडिओ जारी न करण्याचा व इतर अटींवर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.