पाच वर्षांत सर्वाधिक ५४.३२ टक्के मृत्यू या चार आजारांनी; आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून समोर
पणजी : राज्यात हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर आणि यकृतांच्या आजारामुळे होत असलेल्या मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. २०१९ ते २०२३ या पाच वर्षांच्या काळात दुर्धर आजार तसेच इतर कारणांमुळे मृत पावलेल्यांपैकी ५४.३२ टक्के मृत्यू या चार आजारांमुळे झाल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालातील आकडेवारीतून समोर आले आहे.
हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर, यकृतासह तर विविध आजारांनी ग्रस्त असलेले १४,४५०, तर इतर कारणांमुळे मृत पावलेले ९४७ असे एकूण १५,३९७ जण या पाच वर्षांच्या काळात मृत्यूमुखी पडले. त्यातील ८,३६५ जणांचे मृत्यू हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर आणि यकृत या चार आजारांमुळे झालेले आहेत. हे प्रमाण मृतांच्या एकूण आकड्याच्या ५४.३२ टक्के इतके असल्याचे सर्वेक्षण अहवालातील आकडेवारीतून स्पष्ट होते. आकडेवारीनुसार, कॅन्सर वगळता हृदयविकार, मधुमेह, आणि यकृताच्या आजारामुळे मृत पावणाऱ्यांत महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे.
मधुमेही रुग्णांच्या बाबतीत गोवा सध्या इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील कॅन्सर, हृदयविकार आणि यकृतासंबंधी रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. अशा जीवघेण्या आजारांवर मात करण्याचे प्रयत्न आरोग्य खात्याकडून वारंवार सुरू आहेत. तरीही राज्यातील बदलत्या जीवनशैलीमुळे अशा आजारांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंद केलेले आहे.