आधी केली बलात्काराची तक्रार, नंतर केले आरोपीशीच लग्न..!

यूपीच्या तरुणाची पुराव्याअभावी आरोपातून सुटका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th March, 12:21 am
आधी केली बलात्काराची तक्रार, नंतर केले आरोपीशीच लग्न..!

पणजी : बार्देश तालुक्यातील एका युवतीला २०२४ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. मात्र, पीडित युवतीने आपण चुकीची माहिती देऊन तक्रार दिली, तसेच आपण दोघांनी लग्न केल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. याची दखल घेऊन पणजी येथील जलदगती न्यायालयाच्या न्या. दुर्गा मडकईकर यांनी उत्तर प्रदेश येथील २६ वर्षीय संशयिताची पुराव्याअभावी आरोपातून सुटका केली.

या प्रकरणी बार्देश तालुक्यातील पीडित युवतीने पर्वरी पोलीस स्थानकात २७ जुलै २०२४ रोजी संशयित युवकाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात संशयिताने पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका भाड्याच्या खोलीत पीडित युवतीला १ जानेवारी २०१८ ते २७ जुलै २०२४ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, पर्वरी पोलीस स्थानक महिला उपनिरीक्षक प्रज्योती देसाई यांनी संशयित युवकाविरोधात भादंसंच्या कलम ४२०, ३७६ आणि ४९३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी १० ऑगस्ट २०२४ रोजी अटक केली. पोलिसांनी तपासपूर्ण करून २१ सप्टेंबर २०२४ रोजी संशयित युवकाविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. २६ सप्टेंबर २०२३ रोजी न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेत संशयित युवकाविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. याच दरम्यान २५ ऑक्टोबर २०२४ रोजी न्यायालयाने संशयिताची सशर्त जामिनावर सुटका केली.

त्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू असताना पीडित युवती आणि संशयिताने १० जानेवारी २०२५ रोजी लग्न केले. त्यानंतर तिची न्यायालयात उलट तपासणी झाली असता, त्या दोघांनी लग्न केल्याचा जबाब दिला. युवतीचा जबाब झाल्यानंतर व तपास अधिकाऱ्याची न्यायालयात उलटतपासणी केल्यावर न्यायालयाने युवकाची सुटका केली.

चुकीची तक्रार दिल्याचा युवतीचा जबाब

युवतीने चुकीची माहिती देऊन तक्रार दिल्याचे स्पष्ट केले. याशिवाय तिला प्रकरण पुढे चालू ठेवायचे नसल्याने ती खटला मिटवू इच्छिते असा जबाब दिला. या प्रकरणी न्यायालयाने पीडित महिलेसह तपास अधिकाऱ्याची न्यायालयात उलटतपासणी करून वरील निरीक्षण नोंदवून संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. 

हेही वाचा