सुसाईड नोटमधील माहितीच्या आधारे पोलिसांनी केली तपासचक्रे गतिमान
बेळगाव : खानापूर तालुक्यातील बिडी येथे काल गुरुवारी २८ मार्च रोजी संध्याकाळी एका वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. ख्रिश्चन गल्ली, बिडी येथील रहिवासी असलेले डायगो संतान नाझारेथ (वय ८३ वर्ष) आणि त्यांची पत्नी फ्लेविया डायगो नाझारेथ (वय ७९ वर्ष) हे दोघे रात्री ८ वाजता शेजाऱ्यांना मृतावस्थेत आढळले.
फ्लेविया या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळलील्या तर त्यांचे पती डायगो घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. शेजाऱ्यांनी तात्काळ नंदगड पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे नंदगड सीपीआय आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी तपास केला असता, त्या ठिकाणाहून इंग्रजीत लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलेय ?
त्यांना जानेवारी महिन्यापासून दिल्लीतील बीएसएनएलचा उच्चपदस्थ अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने धमकी दिली होती. त्याच्या सिम कार्डचा गैरवापर केल्याबद्दल त्याला 'डिजिटल अटक' केली जात आहे असे कथित फसवणूक करणाऱ्याने डायगोला सांगितले होते. या प्रकारची धमकी देण्यात आली व वरचेवर पैशाची मागणी केली. असे करून साधारण पाच ते सहा लाख रुपये संबंधितांनी लाटल्याचे समजते. त्यामुळे वरचेवर होणाऱ्या या त्रासाला कंटाळून दोघा पती-पत्नीने आत्महत्या केल्याचे समजते.
या दाम्पत्याने गोव्यातील काही जणांकडून कर्जही घेतले होते. यातून मिळालेले पैसे हे कथित फसवणूक करणाऱ्यांच्या घशात गेले. एकूणच प्रकारामुळे त्यांना नाहक मनस्ताप क्षण करावा लागला. देणेकऱ्यांचे वारंवार फोन आणि फसवणूक करणाऱ्याच्या धमक्यांना कंटाळून काल डायगो नाझारेथ यांनी प्रथम आपल्या गळ्यावर आधी चाकूने वार करून घेतला होता व जीव लवकर जात नसल्याचे पाहून पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. तर त्यांच्या पत्नीने विष पिऊन घरामध्येच आत्महत्या केली असल्याचे समजते.
मृतदेह पुढील तपासणीसाठी खानापूर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, अधिकाऱ्यांनी नंदगड पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात या दाम्पत्यास आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मोबाईल, एक विळा आणि सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.
मृत डायगो मंत्रालय (सचिवालय), महाराष्ट्र सरकारमधून निवृत्त झाले होते. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये डायगोने त्यांचे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांना दान करण्याची विनंती केली आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी त्या दोघां पती-पत्नीचे मृतदेह बेळगाव सिविल हॉस्पिटलला दान केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी विविध मार्गांनी गांभीर्याने तपास सुरू केला आहे.