युरी, कार्लुसची प्रभावी कामगिरी

सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक ठरले प्रभावी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 01:04 am
युरी, कार्लुसची प्रभावी कामगिरी

पणजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या चांगल्या कामगिरीमुळे सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षाची कामगिरी अधिक प्रभावी होती. पाणीटंचाई, एनईपी, म्हादई प्रश्न तसेच विविध विधेयकांवरून विरोधकांनी सरकारला काही प्रमाणात गोंधळात टाकले.

गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे अधिवेशनात नेहमीच आक्रमक असतात. या अधिवेशनातही त्यांनी आरोप करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तथापि, युरी आलेमाव आणि कार्लुस फेरेरा यांनी मुद्द्याला धरुन प्रश्न उपस्थित केल्याने विजयपेक्षा युरी आणि कार्लुस यांचा प्रभाव जाणवला. युरी, कार्लुस यांच्यानंतर प्रश्नोत्तरांच्या चर्चेदरम्यानही आपच्या वेंझी व्हिएगस यांनी चांगले मुद्दे मांडले. आरजीचे वीरेश बोरकर यांना अनेकदा सभापतींकडून तंबी मिळते. तथापि, यावेळी त्यांनी सभागृहाच्या नियमांना धरुन मुद्देसूद विचार मांडले.

हे अधिवेशन तीन दिवसांचे होते. तीनच दिवस असल्याने वेळेची मर्यादा होती. तरीही, पाणीटंचाई, जुन्या गोव्यात बेकायदेशीर बांधकाम यासारख्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्यात यश मिळवले. विरोधी पक्षाच्या आमदारांनाही मंत्री किंवा सत्ताधारी आमदारांपेक्षा बोलण्याची जास्त संधी मिळाली. सर्व आमदारांना बोलण्याची संधी देण्यात सभापती रमेश तवडकर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

सरकारने खासगी विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर करूनही, विरोधकांनी चर्चेला तोंड फोडले. जेव्हा खाजगी विद्यापीठे स्थापन केली जातात तेव्हा स्थानिक लोकांना रोजगार मिळण्याची तरतूद असली पाहिजे. स्थानिक विद्यार्थ्यांना सवलती मिळायला हव्यात. युरी आलेमाव आणि एल्टन डिकॉस्टा यांनी विधेयकात ठोस तरतुदींच्या अभावाचा मुद्दा उपस्थित केला. खासगी विद्यापीठांच्या स्थितीचा विचार केला पाहिजे. ऑक्सफर्ड, स्टॅनफोर्ड, एमआयटी सारख्या दर्जेदार विद्यापीठांचे कॅम्पस गोव्यात असले पाहिजेत. गुणवत्ता नसलेले आणि विद्यापीठाच्या प्रमुखाबद्दल शंका असलेले विद्यापीठ फायदेशीर ठरणार नाही, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

युरी आलेमाव यांनी विचारले ५४ प्रश्न

संपूर्ण अधिवेशनात युरी आलेमाव यांचे ५४, एल्टन डिकॉस्टा यांचे ४८ प्रश्न आणि कार्लुस फेरेरा यांचे ४८ प्रश्न होते. यामध्ये तारांकित आणि अतारांकित प्रश्न समाविष्ट आहेत. आम आदमी पक्षाचे वेंझी व्हिएगस यांचे ५० तर क्रूझ सिल्वा यांनी ५३ प्रश्न विचारले होते. गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांनी ५३ प्रश्न विचारले तर आरजीच्या वीरेश बोरकर यांनी ५२ प्रश्न विचारले. 

हेही वाचा