अधीक्षकांचे आदेश : सार्वजनिक कार्यक्रमात सहभागापासून दूर राहावे
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील आठवड्यात दक्षिण गोव्यात शिमगोत्सव मिरवणुकीत ताल धरलेल्या गणवेशातील एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची दखल घेऊन पोलीस खात्याने कर्मचाऱ्यांना ताकीद देत गणवेशाची शान राखण्यासाठी आणि पोलिसांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी सेवा बजावत असताना गणवेशात नाच, गायन अशा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून दूर राहावे, असे निर्देश जारी केले आहेत. या आदेशाद्वारे पोलीस खात्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ‘नाटकां’ना लगाम घातला आहे.
राज्यात पर्यटन खात्याने गेल्या आठवड्यात शिमगोत्सव मिरवणुका आयोजित केल्या होत्या. याशिवाय गणेश चतुर्थी, शिमगोत्सव, कार्निवल व इतर महोत्सव आयोजित केले जातात. अशा मिरवणुकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात केले जात असते. २३ मार्च रोजी सांगे येथे शिमगोत्सव मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिगमोत्सव मिरवणूक सुरू असताना एक पोलीस कर्मचारी मिरवणुकीत ताल धरून गुंग झाला होता. त्याचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच व्हिडिओवरून अनेकांनी पोलिसांवर टिप्पणी केली होती. याची दखल घेऊन पोलीस खात्याने सर्व कर्मचाऱ्यांना आदेश जारी करून वरील प्रकार होऊ नयेत याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
दरम्यान, अशाच प्रकारचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी उत्तर गोव्यातील एका पोलीस उपअधीक्षकाचा व्हायरल झाला होता. संबंधित पोलीस अधिकारी आणि त्याच्या हद्दीतील पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी संबंधित पोलीस उपअधीक्षक त्या ठिकाणी नाच, गाणे करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याशिवाय गणवेशातील काही पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी नागरिकांना किंवा विद्यार्थ्यासाठी आयोजित केलेल्या जागृती किंवा इतर प्रकारच्या कार्यक्रमांत नाच, गाणे करत असल्याचे नेहमीच दिसत असते. याची दखल घेऊन पोलीस खात्याने वरील आदेश जारी केला आहे. याबाबतचा आदेश प्रशिक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक सुचेता देसाई यांनी जारी केला आहे.
आदेशात केलेल्या सूचना
पोलीस दलाची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी गणवेशाच्या शिस्तीचे पालन करावे.
गणवेशात सार्वजनिक व्यासपीठ किंवा रस्त्यांवर नाच, गाणे आदींचे सादरीकरण करणे टाळावे.
सार्वजनिक संपर्क वाढवण्यासाठी आणि पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी गणवेशधारी पोलिसांनी काम करावे.
गणवेशाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग टाळावा.
पोलीस अधिकाऱ्यांनी सादरीकरणातील कथा/संहिता कायदेशीर नियमांनुसार आहे की नाही, याची खात्री करावी.
पोलिसांबाबत संभ्रम निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.