बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढली

यंदा ९०.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; मुलींची बाजी


28th March, 12:54 am
बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढली

पत्रकार परिषदेत माहिती देताना गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये. सोबत विद्यादत्त नाईक आणि भारत चोपडे. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षेत ५.६४ टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी बारावीचा निकाल ८५ टक्के लागला होता. यंदा तो वाढून ९०.६४ टक्के झाला. यंदा परीक्षेला एकूण १७ हजार ६८६ विद्यार्थी बसले होते. यातील १६ हजार ३० उत्तीर्ण झाले. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाल ९२.४२ टक्के, तर मुलांचा निकाल ८८.६९ टक्के लागला आहे. गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी गुरुवारी पर्वरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सचिव विद्यादत्त नाईक आणि सहसचिव भारत चोपडे उपस्थित होते.
राज्यात १० फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. परीक्षेला एकूण ८,४६२ मुले बसले होते. त्यातील ७,५०५ उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८८.७९ टक्के होती. परीक्षा दिलेल्या एकूण ९,२२४ मुलींपैकी ८,५२५ उत्तीर्ण झाल्या. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.४२ आहे. अभ्यासक्रमानुसार पाहता अन्य शाखांपेक्षा वाणिज्य शाखेतील विद्यार्थी यशस्वी ठरले. वाणिज्य शाखेच्या ५,०८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४,७४५ (९३.३१ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेतील ४,०६८ विद्यार्थ्यांपैकी ३,७०३ ( ९१.०३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील ५,०८५ पैकी ४,७४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याशिवाय व्होकेशलन कोर्स करणाऱ्या २,४४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील २,०२४ म्हणजे ८२.७१ टक्के उत्तीर्ण झाले. यंदाच्या परीक्षेत १३८ खाजगी उमेदवारांना संधी देण्यात आली. यातील ३७ जण (२६.८१ टक्के) उत्तीर्ण झाले. आयटीआय केलेल्या ४७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यातील ३७ जण (७८.७२ टक्के) उत्तीर्ण झाल्याचे शेट्ये यांनी सांगितले.