एकमेव सरकारी शाळा असलेल्या सांगे तालुक्याचा निकाल सर्वाधिक

बार्देशचा निकाल ९४.९८ टक्के : सत्तरी तालुक्याचा निकाल सर्वात कमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 12:55 am
एकमेव सरकारी शाळा असलेल्या सांगे तालुक्याचा निकाल सर्वाधिक

पणजी : बारावीच्या परीक्षेत अन्य तालुक्यांच्या तुलनेत सांगे तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९५.९२ टक्के लागला आहे. यंदा सांगेमधील एकमेव सरकारी शाळेतून १४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील १४१ जण उत्तीर्ण झाले. यानंतर बार्देश तालुक्याचा ९४.९८ टक्के, तिसवाडीचा ९४.१४ टक्के निकाल लागला. यंदा सत्तरी तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८१.२२ टक्के लागला आहे.

गोवा शालांत मंडळाने जारी केलेल्या अहवालानुसार, यंदाच्या परीक्षेत सर्वाधिक ३,८३७ विद्यार्थी सासष्टी तालुक्यात होते. यातील ३,५१२ जण (९१.६६ टक्के) उत्तीर्ण झाले. राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी १,२०२ विद्यार्थ्यांना ३३ ते ४५ टक्के गुण मिळाले. ४६ ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६,०२९ होती. ६० ते ८० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७,७२५ तर, ८१ ते १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १,७९१ होती.

यंदा तीन विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने मंडळाने त्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. ३,०६६ विद्यार्थ्यांनी क्रीडा गुणांचा फायदा घेतला होता. यातील १२६ जण क्रीडा गुण वापरुन उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ०.७१ टक्के इतके होते. यंदा बारावीला पुन्हा बसणाऱ्या (रिपिटर) विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५४.३८ टक्के राहिले. तर, १९८ पैकी १६६ दिव्यांग विद्यार्थी (८३.८४ टक्के) उत्तीर्ण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

पडताळणीसाठी १२ एप्रिलपर्यंत मुदत

बारावीच्या निकालाबाबत उत्तर पत्रिकेची छायांकित प्रत मिळवण्यसाठी ५ एप्रिल तर पडताळणी व गुण तपासणीसाठी अंतिम तारीख १२ एप्रिल आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत त्यांच्या शाळेतर्फे विनंती करणे आवश्यक आहे.

जनरल फाऊंडेशन, भूगोल ठरले अवघड विषय

मंडळाने जारी केलेल्या अहवालानुसार यंदा विद्यार्थ्यांना जनरल फाऊंडेशन कोर्स, भूगोल आणि भौतिकशास्त्र हे विषय अवघड गेले आहेत. जनरल फाऊंडेशन कोर्स मध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच ८८.२९ टक्के होते. भूगोल विषयात ८९.१२ टक्के व भौतिकशास्त्रात ८९.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


हेही वाचा