पणजी : तृणमूल काँग्रेसने गोवा आणि केंद्रातील विरोधी पक्षनेत्यांनवर टीका करण्याचा आदेश दिला होता. हा निर्णय खटकल्याने मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सह संयोजक पदाचा राजीनामा दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व भाजप विरोधी सर्व पक्षांनी एकत्र राहणेच योग्य असल्याचे समील वळवईकर यांनी सांगितले. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला निर्णय सांगितला.
वळवईकर म्हणाले की, पक्षाने मला संधी दिली, पद दिले त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. मात्र पक्षाचे काही निर्णय मला योग्य वाटले नाहीत. गोव्यात भाजप विरोधी पक्षांची एकजूट महत्त्वाची आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत पक्षाने काँग्रेस तसेच भाजप बाबत तटस्थ राहण्याचा आदेश दिला. त्याचवेळी मला पक्षाच्या अजेंडा बाबत संशय आला होता. पण त्यावेळी पक्षाचा आदेश डावलून इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता.
ते म्हणाले, यानंतर पक्षाने गोव्यातील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सांगितले. मला हा निर्णय न पटल्याने मी पक्षापासून दूरच होतो. पक्षाच्या पत्रकार परिषदेत मी उपस्थित राहिलो नाही. कारण हे माझ्या नैतिकतेत बसत नव्हते. गोव्यातील प्रश्न उपस्थित करण्या ऐवजी विरोधी नेत्यांना लक्ष्य करणे योग्य नाही. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. भविष्यात मतदासंघांतील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच मी पुढील निर्णय घेणार आहे.