राज्यात २७०८ दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंद
पणजी : दृष्टीदोष, ऐकू येण्यास अडचण असणे अशा व इतर अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेल्या दिव्यांग मुलांना शिक्षण देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरूच आहे. या प्रयत्नांना बऱ्याच प्रमाणात यश सुद्धा येत आहे. सांगे सोडल्यास इतर तालुक्यातील दिव्यांग मुले शाळा/विद्यालयात शिक्षण घेत आहेत. बार्देश तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ६६२ दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंद झाल्याची माहिती आर्थिक सर्वेक्षण अहवालात नोंद झाली आहे. राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा आकडा २७०८ आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी २०२३ - २०२४ वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. या अहवालात २०२३ - २०२४ या शैक्षणिक वर्षातील दिव्यांग विद्यार्थ्यांची आकडेवारी देण्यात आली आहे. सांगे तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंद आहे. पेडणे तालुक्यात ७४, बार्देस तालुक्यात ६६२, डिचोलीत १७७, सत्तरीत १०४, तिसवाडीत ४०४ तर फोंडा तालुक्यात ३५२ दिव्यांग विद्यार्थी आहेत.
दक्षिण गोव्याचा विचार केला तर धारबांदोडा तालुक्यात २३, केपे येथे ३३५, काणकोणात ७०, सासष्टीत २८८ तर मुरगावात दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंद आहे. २०२३ - २०२४ वर्षात राज्यात २७०८ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. याच्या पूर्वी म्हणजे २०२२ - २३ साली २७६९ दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंद होती. याचा अर्थ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आकड्यात घट झाली आहे.