मुंबईत एनसीबीची धडक कारवाई ! दोघांना अटक.
मुंबई : गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकाने मागील शनिवारी २२ मार्च रोजी, येथे एका व्यक्तीच्या घरात छापेमारी केली. त्यांनी येथे ड्रम मध्ये लपवून ठेवलेला तब्बल ४६.८ किलो पावडरसदृश पदार्थ जप्त केला. हा पावडर नंतर मेफेड्रोन नावाचा घातक अमलीपदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी एनसीबीने यानंतर भांडुप येथील दोघांना ताब्यात घेत अटक केली.
या दोघांच्या चौकशीदरम्यान एका संशयिताने सदर पदार्थ हा महाड औद्योगिक क्षेत्र, जिल्हा - रायगड येथील प्रयोगशाळेत तयार केल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने या गुप्त प्रयोगशाळेवर छापे टाकले व येथून अमलीपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायन जप्त केले.
दरम्यान, या औषधाच्या पुरवठादारावर डीआरआयने एनडीपीएस कायद्याअंतर्गत दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सध्या तो जामिनावर असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या अमलीपदार्थ आणि प्रयोगशाळेतील रसायनाची किमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ५० कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती आहे.