हा एक प्रकारचा व्यभिचार, सुपारी घेऊन बोलण्याचं काम - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा याच्या व्हीडिओमध्ये त्याने केलेल्या कवितेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली. मात्र कॉमेडियन कुणाल कामराने आपण माफी मागणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या विनोदासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणाला जबाबदार धरणे योग्य नसल्याचेही कामराने म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भर देत आपण पोलीस आणि न्यायप्रणालीला सहकार्य करण्यास तयार असल्याचं कामरानं म्हटलं आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी नक्की काय?
कुणाल कामराने त्याच्या एका कॉमेडी शोमध्ये एका गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी केली होती. त्यानंतर रविवारी (२३ मार्च) रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतल्या खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली.
याप्रकरणी शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरा, संजय राऊत, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान तोडफोडीच्या घटनेवर कामरानंही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या कॉमेडी काँटेंटसाठी हॅबिटॅटला जबाबदार धरू नये, असं कामरा म्हणाला.
तोडफोड प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले...
या तोडफोड प्रकरणानंतर राज्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. अखेर एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरील मौन सोडलं आहे.शिंदे म्हणाले, "खरं म्हणजे आरोपांवर मी प्रतिक्रिया देतच नाही. सरकार स्थापनेनंतर पहिल्या दिवसापासून आरोपांच्या फैरी लोकं झाडत होते. आम्ही पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला वगैरे आरोप करुनही जनतेनं जर आम्हाला मँडेट दिला असेल, तर तुम्ही गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे समजून जा.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे ठिक आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊन बोलणार असाल तर हा एक प्रकारचा व्यभिचार, स्वैराचार आणि एकप्रकारे सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे. याच माणसाने सरन्यायाधीशांबद्दल, पंतप्रधानांबद्दल, निर्मला सीतारमण यांच्याबद्दल, उद्योगपतींबद्दल काय बोलला आहे ते पाहा" असंही शिंदे म्हणाले.