
नवी दिल्ली : जुना आयकर कायदा १९६१ (Old Income Tax Law 1961) ला बदलून देशात आता नवा आयकर कायदा (New Income Tax Law) लागू करण्याचे केंद्र सरकारने (Central Government) ठरवले आहे. १ एप्रिल २०२६ पासून देशभरात नवा आयकर कायदा लागू होणार आहे. कायद्यातील नवा बदल म्हणजे आता ‘प्रीव्हियस इयर’ व ‘असेसमेंट इयर’ऐवजी ‘टॅक्स इयर’ वापरला जाणार आहे. नवा बदल सामान्य करदात्याला फायदेशीर ठरणार असून, आयकर भरताना कमी गोंधळाला सामोरे जावे लागणार आहे. कर अहवाल देण्याचे व उत्पन्न मिळवण्याचे वर्ष एकच असणार आहे.
आयकर कायदा १९६१ मध्ये आतापर्यंत उत्पन्न मिळवण्याचे वर्ष व आर्थिक वर्ष (एफवाय) म्हणून ओळखले जात होते व त्यावर कराचे मू्ल्यांकन पुढील वर्षात होत होते. त्याला असेसमेंट इयर (एवाय) म्हटले जात होते. त्यात २०२४ २५ मध्ये कमावलेले उत्पन्न २०२५ २६ मध्ये मूल्यांकित केले जात होते. त्यामुळे सामान्य माणूस गोंधळत असे; त्याला उत्पन्न कोणत्या वर्षाचे व मूल्यांकन कोणत्या वर्षाचे आहे हे समजणे अडचणीचे होत होते. नव्या कायद्यात ‘टॅक्स इयर’ हे उत्पन्न कमावण्याचे व अहवाल देण्याचे एकच वर्ष मानले जाणार आहे. म्हणजेच ज्या वर्षी उत्पन्न कमावले, त्याच वर्षी त्याचा कर भरला जाईल आणि मूल्यांकन केले जाणार असल्याचे नव्या कायद्यात दिसून येत आहे.